ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

दहा वर्षांचा वनवास संपला! वणी–शिरपूर बससेवा पुन्हा सुरू; मोहद्यात जल्लोषात स्वागत

On: August 17, 2026 2:03 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनीधी


नागपंचमीच्या शुभप्रभाती वणी–शिरपूर–वेडाबाई–मोहदा–नेरड–पूरड या मार्गावरील बहुप्रतीक्षित बससेवा तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दीर्घकाळापासून बंद असलेली ही बससेवा पूर्ववत झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रवासाची मोठी अडचण दूर झाली आहे.

बससेवा पुन्हा सुरू होण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. विजय भाऊ पिदुरकर यांच्या पुढाकारासह मोहदा सरपंच सौ. वर्षा राजुरकर आणि उपसरपंच श्री. सचिन रासेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत अखेर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

🎯 मोहदा बसस्थानकावर उत्साहाचे वातावरण

बससेवा सुरू झाल्यानिमित्त मोहदा बसस्थानक येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नागपंचमीच्या दिवशी बस गावात दाखल होताच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात तिचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच नालंदा विद्यालय, वेडाबाई येथील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बससेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे श्री. विजय पिदुरकर यांचा तसेच बसचे चालक चंदू मेश्राम आणि वाहक सचिन भगत यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. वर्षा राजुरकर, उपसरपंच सचिन रासेकर आणि उपस्थित ग्रामस्थांनी बससेवा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

🎯 विद्यार्थ्यांना सर्वाधिक दिलासा

गेल्या दहा वर्षांपासून बससेवा बंद असल्याने मोहदा, वेडाबाई, नेरड, पूरड आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. आता बससेवा सुरू झाल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय नागरिकांना बाजारपेठ, शासकीय कार्यालये, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी तसेच इतर दैनंदिन कामांसाठी वणी व शिरपूरसह संबंधित गावांमध्ये ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे.

🎯 दहा वर्षांच्या प्रतीक्षेला मिळाला पूर्णविराम

“दहा वर्षांपासून बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू व्हावी, ही परिसरातील नागरिकांची सातत्यपूर्ण मागणी होती. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. नागपंचमीच्या दिवशी मिळालेली ही बससेवेची भेट परिसरासाठी आनंदाची आणि दिलासादायक आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, ही बससेवा नियमितपणे सुरू राहावी आणि भविष्यात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन या मार्गावर आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दहा वर्षांचा बससेवेचा वनवास संपल्याने मोहदा परिसरातील ग्रामीण दळणवळणाला नवी गती मिळाली असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे. नागपंचमीच्या शुभदिनी सुरू झालेली ही बससेवा परिसराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे आणि दिलासादायक पाऊल ठरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment