ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा; मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

On: August 19, 2026 1:56 AM
Follow Us:
---Advertisement---

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन; तब्बल २ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

✍️वणी : प्रतिनीधी


आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील कोणताही नागरिक दर्जेदार उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने मारेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या शिबिरात तब्बल २ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

“आरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा असून, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी केले.

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मारेगावच्या विशेष सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मारेगाव येथे या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

🎯 तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी

शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. नेत्ररोग, मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, श्वसनरोग, त्वचारोग आणि मुखरोग आदी विभागांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात आली.

याशिवाय ईसीजी, मॅमोग्राफी, रक्तदाब, रक्तशर्करा यांसह आवश्यक प्राथमिक तपासण्याही करण्यात आल्या. तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भरती होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, भोजन तसेच रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्याची सुविधा असल्याने गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

🎯 आयुष्मान भारत कार्डची सुविधाही

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच भविष्यातील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग नागरिकांसाठी सुकर झाला.

यावेळी ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

🎯 ग्रामीण नागरिकांसाठी तज्ज्ञ आरोग्यसेवा दारात

शिबिराला सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच मारेगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी आमदार संजय देरकर म्हणाले, “मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ आरोग्यसेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. एका छताखाली हजारो नागरिकांची तपासणी होणे आणि गरजू रुग्णांना पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध होणे, ही या शिबिराची मोठी फलश्रुती आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव सोबत उभे राहणे, हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गाभा होता. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न आहे.”

मारेगाव व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची मालिका यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

🎯 मान्यवरांची उपस्थिती

शिबिराला यवतमाळ शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तहसीलदार निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, मारेगाव नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, महिला जिल्हाप्रमुख डिमानताई टोंगे, जिल्हा संघटक गणपतजी लेडांगे, किरणताई देरकर, वणी विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, माजी नगराध्यक्ष इंदुताई किन्हेकर, जिनाताई वरारकर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, सुरेखाताई ढेंगळे, वैशालीताई देठे, सविताताई आवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मडावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. इंगळे, डॉ. शशांक घोटकर, डॉ. प्रिया गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

🎯 पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे विशेष परिश्रम

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, अभय चौधरी, बदरुधीन काजी, देवा बोबडे, नगरसेविका वर्षा किंगरे, मालाताई बदकी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शिबिरात मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी सुरळीतपणे पार पडली. सेवा, संवेदना आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद मारेगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांची जाणीव करून देणारा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment