ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पिंपरी (कायर) येथे सार्वजनिक वाचनालयाची मागणी

On: August 25, 2026 1:52 PM
Follow Us:
---Advertisement---

विद्यार्थ्यांसह युवकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार; शुभम गोरे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

✍️वणी | प्रतिनिधी


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हक्काची आणि अभ्यासपूर्ण जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पिंपरी (कायर) येथे सार्वजनिक वाचनालय व अध्ययनिका सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ आणि युवकांनी केली आहे. विजयबाबू चोरडिया, शिवसेना जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना लोकसभा समन्वयक शुभम सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती, वणी येथील गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

पिंपरी (कायर) गावातील अनेक विद्यार्थी आणि युवक विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र, गावात स्वतंत्र वाचनालय अथवा अध्ययनिकेची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अभ्यासासाठी वणी शहराचा आधार घ्यावा लागतो. आर्थिकदृष्ट्या सर्वच कुटुंबांना शहरात राहून शिक्षण घेणे किंवा दररोज प्रवास करणे शक्य नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावात वाचनालय सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ साहित्य, वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, वाचनालयासाठी आवश्यक खोली अथवा जागा उपलब्ध करून देण्याची तयारी ग्रामपंचायतीने दर्शविली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून केवळ प्रशासकीय मान्यता आणि आवश्यक आर्थिक सहकार्य मिळाल्यास वाचनालय सुरू करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. शासनाच्या संबंधित योजनेंतर्गत पिंपरी (कायर) येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

या निवेदनावेळी शिवसैनिक अनिकेत चामाटे, अविनाश पेंदोर, मयूर काळे, रोशन जांभुळकर, मंगेश पिंपळशेंडे, विनोद नलभीमवार, स्नेहल गेडाम, कार्तिक डोंगरकर यांच्यासह पिंपरी येथील असंख्य युवक उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बळ देण्यासाठी वाचनालय ही काळाची गरज असून, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पिंपरी (कायर) येथील वाचनालयाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment