⛔दोन नवीन वर्गखोल्यांना तातडीने मंजुरीची मागणी; २३ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
✍️वणी | महेश टिपले
वणी तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्यांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कवडशी येथील जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेतील काही वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा इमारतीत बसवून शिक्षण देणे कितपत सुरक्षित, असा प्रश्न पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

🎯 वर्गखोलीचा काही भाग कोसळला; सुदैवाने अनर्थ टळला
शाळेतील एका धोकादायक वर्गखोलीचा काही भाग कोसळल्याची घटना यापूर्वी घडली आहे. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात अशी घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कागदोपत्री न ठेवता तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नवीन वर्गखोल्यांसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शिक्षण विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. बांधकाम विभागाकडूनही यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यानुसार जुन्या दोन वर्गखोल्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही पूर्ण करून नवीन दोन वर्गखोल्यांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
🎯 खाणबाधित क्षेत्रातील निधीचा उपयोग शाळेसाठी करण्याची अपेक्षा
कवडशी हे गाव खाणबाधित क्षेत्रात येत असल्याने परिसरातील कोळसा खाणीतून मिळणाऱ्या खनिज विकास निधीचा उपयोग गावाच्या मूलभूत विकासासाठी प्रभावीपणे करण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या शाळेच्या नवीन इमारतीसाठी या निधीतून प्राधान्याने तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

🎯 बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या शेडची मागणी
नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने, तोपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी शिक्षण देता यावे यासाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये बसविण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याइतकीच त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन नवीन वर्गखोल्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. कवडशीतील २३ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासन किती गांभीर्याने घेतो, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.








