ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

विकासकामांसाठी आमदार संजय देरकर आक्रमक; वणी विधानसभा क्षेत्रासाठी निधीचा जोरदार आग्रह

On: August 26, 2026 1:45 PM
Follow Us:
---Advertisement---

रस्ते, आरोग्य, जलसंधारण, वनविकास, वीजपुरवठा आणि नगरविकासाच्या प्रश्नांवर शासनाचे वेधले लक्ष

✍️वणी | प्रतिनिधी

वणी विधानसभा क्षेत्रातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासह शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि दुर्गम भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना बैठकीत विविध मागण्या ठामपणे मांडल्या. वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुक्यांतील रस्ते, आरोग्य, जलसंधारण, वनविकास, वीजपुरवठा, नगरविकास यांसह अनेक प्रश्नांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधून संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

🎯 शेत-पाणंद रस्त्यांसाठी स्पष्ट धोरणाची मागणी

मारेगाव व झरी-जामणी नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेतांकडे जाणारे शेत व पाणंद रस्ते बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेतून करता येतात का, तसेच नगरपंचायत हद्दीसाठी याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश आहेत का, याबाबत आमदार देरकर यांनी स्पष्टीकरण मागितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वणी विधानसभा क्षेत्रासाठी आवश्यक रस्त्यांची लांबी मंजूर का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेत वणी विधानसभा क्षेत्रात रस्त्यांची आवश्यकता सर्वाधिक असतानाही यवतमाळ विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत वणीला कमी निधी का देण्यात आला, याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

🎯 ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

वणी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे आमदारांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्रव्यवहार करूनही आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कायर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षकांची दोन पदे तसेच औषधनिर्मात्याचे एक पद रिक्त असल्याने ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, शिंदोला हे सुमारे १५ गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून परिसरात खाणी असल्याने येथे सक्षम आरोग्यसेवेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिंदोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन डॉक्टर, कर्मचारी, औषधे, प्रयोगशाळा, प्रसूती आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार देरकर यांनी केली.

🎯 मारेगाव आणि वणी शहरासाठी विशेष निधीची मागणी

नगरोत्थान योजनेअंतर्गत मारेगाव नगरपंचायतीस आवश्यक निधी मंजूर करून विकासकामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने या प्रभागाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

🎯 भूजल पातळी खालावत असल्याने जलसंधारणावर भर

वणी विधानसभा क्षेत्रातील भूजल पातळी सातत्याने खालावत असल्याने महसूल विभागाच्या जागेवर तलाव व जलसाठे निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी आमदारांनी केली. यासाठी जिल्हा नियोजन समिती, मृद व जलसंधारण विभाग किंवा उपलब्ध अन्य निधीतून ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

🎯 वनविकासासह पर्यटनाला चालना देण्याचा आग्रह

विधानसभा क्षेत्रातील वनक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत वन विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अडकोली-पवनार परिसरात वन्यजीव सफारी सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करून आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.

वणी तालुक्यातील कवडशी येथे इको-टुरिझम विकसित करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी आमदार देरकर यांनी केली.

🎯 ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवा

महावितरणच्या कृषी पंपांसाठी नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागत असल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

नादुरुस्त कृषी ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभी करून प्रतीक्षा कालावधी कमी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

🎯 गावागावातील स्मशानभूमींच्या सुविधांसाठी निधी द्या

मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पुरेशा व सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी हा प्रश्न गांभीर्याने मांडला.

स्मशानभूमीची आवश्यकता असलेल्या गावांची संख्या निश्चित करून तेथे शेड, पाणी, रस्ता, विद्युत व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.

🎯 मूर्ती-बोरी पुलासाठी तातडीने निधी

पैनगंगा नदीकाठावरील मूर्ती गावाचा पावसाळ्यात वारंवार संपर्क तुटतो. मूर्ती-बोरी मार्गावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावाचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क खंडित होतो. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याच्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, अशी मागणी आमदार देरकर यांनी केली.

जिल्हा वार्षिक योजना बैठकीत आमदार संजय देरकर यांनी मांडलेल्या मागण्यांमधून वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, कामगार, आदिवासी तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. आता संबंधित विभागांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment