⛔ गणेशमूर्ती स्थापनेदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन; पांढरकवडा पोलिसांची कारवाई
✍️पांढरकवडा | अशफाक खान
गणेशमूर्ती स्थापनेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून प्रतिबंधित साउंड सिस्टीम वाजविण्याच्या तयारीत असलेल्या दोन डीजे वाहनांवर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन टाटा एस वाहने डिटेन करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशमूर्ती स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केली. ग्राम पढा येथे टाटा एस वाहन क्रमांक MH 01 CV 9978 आढळून आले. या वाहनाचा चालक दुर्गादास सुरेश कुडमेथे (वय २२), वाहनमालक विशाल हनुमान राउत (वय २६) आणि डीजे चालक पवन पुंडलिक सहारे (वय २२, रा. मोहदा) हे वाहनासह आढळून आले. वाहनामध्ये प्रत्येकी दोन बेस, दोन टॉप, दोन स्पार्क लाईट तसेच साउंड सिस्टीम असा डीजेचा साहित्यसाठा आढळला.
दरम्यान, ग्राम शामपूर तांडा येथे टाटा एस वाहन क्रमांक MH 02 CE 5467 वरही पोलिसांनी कारवाई केली. या वाहनाचा चालक प्रविण पांडुरंग सुरपाम (वय २३) आणि डीजे चालक धीरज रमेश राठोड (वय २३, रा. वागदा) हे डीजे साहित्यांसह आढळून आले.
दोन्ही वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डीजे साउंड सिस्टीमसाठी आवश्यक कागदपत्रे, वाहन मॉडिफिकेशन प्रमाणपत्र तसेच चालक परवाना आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही वाहने मोटार वाहन कायद्यातील कलम २०७ अन्वये पांढरकवडा पोलीस ठाण्यात डिटेन करण्यात आली आहेत. वाहनांची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर, डीजे व इतर ध्वनिवर्धक साधनांच्या वापराबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा पोलिसांच्या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात नियमबाह्य डीजे वापरणाऱ्यांना चांगलाच इशारा मिळाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, सहायक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सचिन काकडे आणि पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी केली.
टीप – गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्या शिवाय वाहनावर भोंगे, बाँक्स, बँन्जो लावलेले वाहन पोलीस परवानगी शिवाय मिरवणुकीमध्ये वापरू नये. तसेच कोणतेही माँडीफाय केलेले वाहन RTO यांचे परवानगी शिवाय मिरवणुकीत वापरू नये. (ठाणेदार पो.स्टे. पांढरकवडा)









