ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

WCLच्या CMD सोबत आमदार संजय देरकर यांची महत्त्वपूर्ण बैठक

On: September 27, 2026 3:32 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ वणी, वणी नॉर्थ व माजरी क्षेत्रातील जमीन संपादन, रोजगार, पुनर्वसन, रस्ते, प्रदूषण आणि सुरक्षा प्रश्नांवर सविस्तर चर्चा; प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याची मागणी

✍️वणी : महेश टिपले


वणी विधानसभा क्षेत्रातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत येणाऱ्या वणी, वणी नॉर्थ आणि माजरी क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली WCL चे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. हेमंत पांडे यांच्यासोबत नागपूर येथील CMD कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकरी, स्थानिक नागरिक, युवक, पुनर्वसित गावांतील मूलभूत सुविधा तसेच खाण परिसरातील पर्यावरण व सुरक्षा यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत जमीन संपादन, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन, रोजगार, प्रलंबित रोजगार प्रकरणांचा कालबद्ध निपटारा, रस्ते, ओव्हरबर्डन डम्पिंग, धूळ प्रदूषण, खाण सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि पुनर्वसित गावांतील मूलभूत सुविधांचा विकास या विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले.

🎯 शिवनी, कोलेरा-पिंपरीसह विविध प्रकल्पबाधित गावांचे प्रश्न ऐरणीवर

माजरी क्षेत्रातील प्रस्तावित शिवनी प्रकल्प, वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा-पिंपरी पुनर्वसन, तसेच वणी क्षेत्रातील कोलगाव विस्तारीकरण, मुंगोली आणि साखरा येथील प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देणे, पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती देणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे आवश्यक असल्याचे आमदार देरकर यांनी स्पष्ट केले.

🎯 प्रकल्पबाधितांना स्थानिक पातळीवरच रोजगार देण्याची मागणी

प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या कुटुंबातील पात्र उमेदवारांना रोजगार देताना शक्यतो त्याच प्रकल्पात, त्याच क्षेत्रात किंवा जवळच्या WCL क्षेत्रात पदस्थापना देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट आणि प्रभावी SOP (Standard Operating Procedure) तयार करण्यात यावी, अशी मागणीही आमदार संजय देरकर यांनी केली.

यामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील युवकांना रोजगारासाठी दूरवर स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

🎯 रस्त्यांच्या दर्जेदार कामांसोबत धूळ प्रदूषणावर नियंत्रणाची मागणी

WCLच्या कोळसा वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रस्ते व पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. वणी–यवतमाळ मार्गाला जोडणारे रस्ते, भांदेवाडा–राजूर रस्ता तसेच जुनाड फाटा–उकणी खदान रस्ता यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

कोळसा वाहतुकीदरम्यान होणारे धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांचे टायर वॉशिंग, कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्रीचा अनिवार्य वापर आणि पुलांची नियमित साफसफाई यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली.

🎯 उकणी खाण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांवर भर

८ मे २०२६ रोजी उकणी कोळसा खाण येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दाही बैठकीत गांभीर्याने मांडण्यात आला. खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुरक्षा मानकांचा नियमित आढावा घ्यावा, संभाव्य धोकादायक ठिकाणांची तपासणी करावी आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

🎯 प्रकल्पबाधित गावांमध्ये नियमित आरोग्य शिबिरांची मागणी

वणी आणि वणी नॉर्थ क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव भासू नये यासाठी दर महिन्याला नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी करण्यात आली. पुनर्वसित गावांमध्ये RCC नाले, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था आणि दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

तसेच WCLच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.

🎯 प्रत्येक प्रश्नावर अधिकृत Proceeding तयार करण्याची मागणी

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्याबाबत अधिकृत Proceeding तयार करावी, संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करावी आणि प्रत्येक प्रकरणासाठी कालमर्यादा निश्चित करून त्याचा पाठपुरावा करावा, अशी ठाम मागणी आमदार संजय देरकर यांनी केली.

प्रकल्पांमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नयेत, तसेच रोजगार, पुनर्वसन, रस्ते, आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी WCL प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

🎯 बैठकीस पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती

या बैठकीस जिल्हाप्रमुख संजय निखाडे, नगरसेवक सुधीर थेरे, नगरसेवक अजय धोबे, वणी शहरप्रमुख विनोद धुमणे, रुपेश ठाकरे, विठ्ठल बोंडे, शंकर देरकर, प्रितम बोबडे, जितेंद्र बोंडे, प्रवीण मांडवकर, मारोती परागे, सुमित बाभुळकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

वणी विधानसभा क्षेत्रातील WCLशी संबंधित प्रश्न एकाच बैठकीत व्यापक स्वरूपात मांडण्यात आल्याने आता या प्रश्नांवर प्रशासनाकडून कोणत्या स्वरूपाची कार्यवाही होते, याकडे प्रकल्पबाधित शेतकरी, स्थानिक नागरिक आणि युवकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment