⛔ ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश देत फार्मसी विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श
✍️वणी : महेश टिपले
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी आणि सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर तसेच फार्मासिस्ट विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान – चला, करूया जीवनदान’ या संदेशाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फार्मसीचे शिक्षण घेत असतानाच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेतला. ‘रक्तदान करा – जीवन वाचवा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना नियमित रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी फार्मासिस्ट विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्यजागृती आणि सामाजिक सेवेसंदर्भात जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या हातातील विविध संदेशफलक आणि घोषणांमधून रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यामुळे परिसरात सामाजिक जनजागृतीचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आर. व्ही. रणदिवे, WCLचे सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी, तसेच हेडगेवार ब्लड सेंटर आणि श्री. किरण इंगळे, PRO यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराच्या नियोजनापासून ते आयोजनापर्यंत त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे उपक्रम सुरळीतपणे पार पडला.
🎯 संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन
या सामाजिक उपक्रमासाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य दिल्याबद्दल सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष श्री. प्रदीप बोनगीरवार तसेच व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. मोहन बोनगीरवार यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल डॉ. सुनील व्ही. पवार, प्राचार्य, सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी आणि मा. सौ. पूजा राणी मॅडम, प्राचार्य, सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज यांचेही अभिनंदन व आभार मानण्यात आले.
🎯 शिक्षणासोबत सेवाभावाची जपणूक
फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जबाबदारी न निभावता समाजसेवा, मानवता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला. रक्तदानाच्या माध्यमातून एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर मांडली.
‘फार्मासिस्ट दिन साजरा करूया, समाजसेवेचा संदेश देऊया!’ या भावनेतून पार पडलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावाची जाणीव अधिक दृढ केली. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.










