⛔ लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; पालकांकडून उपक्रमाचे कौतुक
✍️वणी: महेश टिपले
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे, या उद्देशाने वणीतील नांदेपेरा रोडवरील लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लब वणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला यांच्या संकल्पनेतून हा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये दात व डोळ्यांशी संबंधित समस्या वेळेत निदर्शनास याव्यात आणि त्यांना योग्य आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.
🎯 तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची तपासणी
शिबिरात वणीतील दंततज्ज्ञ डॉ. विजय राठोड, डॉ. रेशम शुगवानी, डॉ. ऋषभ राठोड आणि डॉ. रोशनी सुराना यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील गोहोकार, डॉ. कोमल गोहोकार आणि डॉ. पवन भंडारी यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना व मार्गदर्शन केले.
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, नियमित ब्रश करण्याची योग्य पद्धत, डोळ्यांची निगा, मोबाईल व स्क्रीनचा वापर करताना घ्यावयाची काळजी तसेच आरोग्यदायी सवयींबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी प्राथमिक पातळीवरच लक्षात येण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी शिबिरांचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
🎯 मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टरांचे स्वागत
शिबिराच्या प्रारंभी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वागत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेवजी खुंगर, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, उपाध्यक्ष लायन महेंद्र श्रीवास्तव, सचिव डॉ. प्रा. अभिजीत अणे, कोषाध्यक्ष नंदलाल शुगवानी तसेच सदस्य यश श्रीवास्तव, किसन चौधरी, भिकचमचंद गोयनका, अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे आणि विद्यालयाच्या प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी केले.
🎯 पालकांकडून उपक्रमाचे कौतुक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याकडेही विद्यालय व लायन्स क्लबकडून लक्ष दिले जात असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची नेत्र व दंत तपासणी मोफत करून देण्यात आल्याने पालकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरला.
विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळते. त्यामुळे भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










