⛔ अक्षय रामटेके फिल्म प्रोडक्शनची सामाजिक आशयाची कलाकृती; अल्पावधीत हजारो व्ह्यूजचा टप्पा पार
✍️वणी : महेश टिपले
तरुणाईला भेडसावणाऱ्या व्यसनाधीनतेच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा आणि क्षणिक सुखाच्या मागे धावताना उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याचे वास्तववादी चित्रण करणारा ‘अधोगती 2’ हा बहुचर्चित लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच या कलाकृतीला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अक्षय रामटेके फिल्म प्रोडक्शन निर्मित या लघुपटाने अल्पावधीतच हजारो व्ह्यूजचा टप्पा पार केला असून विशेषतः तरुण प्रेक्षकांकडून या लघुपटाचे कौतुक होत आहे.
२८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ‘अक्षय रामटेके फिल्म’ या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ‘अधोगती 2’ प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनापूर्वीपासूनच या लघुपटाची चर्चा सुरू होती. प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मोठा प्रतिसाद दिला. मनोरंजनासोबतच समाजातील एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी कलाकृती म्हणून या लघुपटाकडे पाहिले जात आहे.
🎯 व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचे विदारक वास्तव
आजच्या काळात तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळते. क्षणिक आनंद आणि सुखाच्या मोहापायी सुरू झालेली व्यसनाची सवय पुढे व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर कसा परिणाम करते, याचे प्रभावी आणि वास्तववादी चित्रण ‘अधोगती 2’ मधून करण्यात आले आहे.
व्यसनामुळे एका सुंदर आणि आशादायी आयुष्याची हळूहळू होणारी अधोगती, त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक प्रश्न आणि त्याचे गंभीर परिणाम प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहेत. त्यामुळे हा लघुपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता तरुणाईला आत्मपरीक्षण करायला लावणारा सामाजिक संदेश देणारा प्रयत्न ठरला आहे.
🎯 ‘ही केवळ फिल्म नाही, तर तरुणांसाठी आरसा’
लघुपटाचे निर्माते व दिग्दर्शक अक्षय रामटेके यांनी या कलाकृतीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ‘अधोगती 2’ ही केवळ फिल्म नसून आजच्या तरुणांसाठी एक आरसा आहे. ही कथा प्रत्येकाने पाहावी आणि त्यातून सकारात्मक बोध घ्यावा, हीच आमची इच्छा आहे.
वास्तववादी मांडणी, प्रभावी दिग्दर्शन आणि सामाजिक आशय यामुळे लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत आहे.
🎯 हर्षद गहुकर यांच्या प्रभावी लेखणीतून कथा-पटकथा
या लघुपटाचे निर्माण व दिग्दर्शन अक्षय रामटेके यांनी केले असून हर्षद प्रमोद गहुकर यांनी कथा व पटकथा लिहिली आहे. सामाजिक वास्तवाशी जोडलेली कथा प्रभावी पद्धतीने पडद्यावर साकारण्यात आली आहे. लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण वणी परिसरात करण्यात आले आहे.
🎯 दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची साथ
‘अधोगती 2’मध्ये मंजुषाताई कोणप्रतिवार, श्वेताताई लिहितकर, गुणगुण डाखरे, सुकेशनी इनामे, वैष्णवी बरडे, संयुक्ता ढवळे, शुभम ताराचंद, रंगनाथ रुईकर, अदनान शेख, समीर खान, मंगेश गहुकर, कुणाल मुत्यलवार, सुमित ठमके, शैलेश आडपावार, संजय कालर, आकाश महाडुळे, बुद्धघोष लोणारे, प्रवीण खानझोडे, पवन सुभाष पुल्लेवार, हर्षद प्रमोद गहुकर, तेजस खैरे, सतीश मुसळे, वेदांत चेलमेलवार, रुपेश कांबळे, दीपक मडावी, अंकुश भांडेकर, मिथिलेश ठमके, शंकर घुगरे, मुकेश सोनटक्के आणि महादेव शेळकी गणेश मत्ते एक्टिंग कलाकार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना वास्तववादी अभिनयाची जोड मिळाल्याने कथानक अधिक प्रभावी झाले आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत लघुपटाच्या सामाजिक संदेशाला अधिक परिणामकारक बनविले आहे.
🎯 वणीच्या कलाविश्वाला नवी ओळख
वणीसारख्या शहरात स्थानिक कलाकार आणि निर्मात्यांनी सामाजिक विषयावर आधारित दर्जेदार लघुपटाची निर्मिती करून तो डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. स्थानिक परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ आणि कलावंतांच्या सहभागातून साकारलेली ही कलाकृती वणीच्या कलाक्षेत्रासाठीही एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
‘अधोगती 2’ हा लघुपट ‘अक्षय रामटेके फिल्म प्रोडक्शन’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध असून, तरुणाईने हा लघुपट पाहून व्यसनमुक्त आणि सकारात्मक जीवनाचा संदेश आत्मसात करावा, असा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.










