ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

प्रशासनाला अखेर जाग; मनसेच्या आंदोलनाला यश

On: October 7, 2026 7:20 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ नांदेपेरा–शेलू रस्त्याच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात; नूतनीकरणाचेही लेखी आश्वासन

✍️वणी: प्रतिनिधी


नांदेपेरा–शेलू आणि नांदेपेरा–रांगणा या प्रमुख मार्गांची झालेली दयनीय अवस्था, रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व शेलू ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंदोलनाची तातडीने दखल घेत नांदेपेरा ते शेलू रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात केली असून, रस्त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

नांदेपेरा–शेलू मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला होता. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, रुग्ण, शेतकरी, कामगार आणि चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा दुचाकीस्वार घसरून किरकोळ अपघातही घडत असल्याने हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत होता.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, गावातील एका दुर्दैवी घटनेमुळे तसेच प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान, एक महिना उलटूनही रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने मनसे पदाधिकारी व ग्रामस्थांचा संयम सुटला. अखेर मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाणेदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन देत ७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने प्रशासनाला कडक शब्दांत इशारा देत, आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची राहील, असे पत्राद्वारे स्पष्ट केले होते.

🎯 आंदोलन सुरू होताच अधिकारी घटनास्थळी

मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अखेर हालचाली सुरू केल्या. ७ ऑक्टोबर रोजी आंदोलनाला सुरुवात होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे यांच्यासह अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मनसे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून रस्त्याच्या समस्येची पाहणी केली.

अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्याचे पाऊल उचलले. तसेच नांदेपेरा–शेलू रस्त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.

🎯 काम पूर्ण होईपर्यंत मनसेची नजर

मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या आंदोलनाच्या यशाबद्दल शेलू, नांदेपेरा आणि रांगणा परिसरातील ग्रामस्थांनी मनसे नेते राजू उंबरकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मनसे पदाधिकारी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

«“प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. जनतेच्या हक्कासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनसे सदैव रस्त्यावर उतरेल. आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचे या कामावर पूर्ण लक्ष राहील.”
— फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे वणी»

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment