✍️पांढरकवडा : अशफाक खान
स्थानिक गुरुकुल व इंग्लिश मिडीयम स्कूल येथे युकेजी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आईसाठी त्यांच्या पाल्यांसोबत एक दिवसाची शाळा भरविण्यात आली. शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी पालक व शिक्षक यांचे नाते अधिक दृढ व्हावे या अनुषंगाने मातृ पालकांसाठी एक दिवसीय शाळा भरविण्यात आली. सर्व मातृपालक त्यांच्या पाल्यांसोबत शाळेच्या बसमधून शाळेच्या वेळेवर शाळेमध्ये आले. त्यांचे दमदार स्वागत शाळेतील शिक्षकांद्वारे करण्यात आले. त्यानंतर आपल्या पाल्यांसोबत त्यांना त्यांच्या वर्गांमध्ये बसविण्यात आले शाळेची असेंबली, त्यानंतर शाळेच्या वेळापत्रका नुसार मातृ पालकांची तासिका घेण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसोबतच त्यांनाही गृहपाठ तसेच विविध कृतीयुक्त शिक्षण देण्यात आले. त्यानंतर शाळेचे नृत्य व संगीत शिक्षक पवन धाबेकर व रवी शेंडे यांनी मातृपालकांसाठी योगा व पिटी मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले. त्यानंतर सर्व मातृपालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व मातृपालकांना त्यांच्या बाल जीवनातील शालेय जीवनाची आठवण झाली.यावेळी शाळेचे अध्यक्ष मदन जिड्डेवार, उपाध्यक्ष नितीन उत्तरवार , सचिव राजेश सातुरवार , संचालक नरेंद्र नार्लावार व प्रा. डॉ. प्रदीप झिलपिलवार आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गोकुलम प्रीप्रायमरी स्कूलच्या मुख्य रुबीना जीवाणी तसेच त्यांच्या सर्व टीमने , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी सर्व पालकांनी शाळेचे आभार मानून व भरभरून कौतुक करून भविष्यातही अशा नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करावे याकरिता शुभेच्छा दिल्या.









