✍️पांढरकवडा : अशफाक खान
घुबडी ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संविधानाबद्दल गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर सरपंच पांडुरंग कुमरे विराजमान होते. ग्रामपंचायत सदस्य नामदेव बनसोड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी गंगारेड्डी क्यातमवार, विजय गडसणवार, संतोष ताटे, निखिल मेश्राम, रमेश, अरुण क्यातमवार, तसेच ग्रामपंचायत सचिव प्रवीण येडमे, सूरज आत्राम, निखिल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधान निर्मात्यांना विनम्र अभिवादन करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. ग्रामपंचायतीतर्फे संविधान दिनाचे महत्त्व, नागरिकांच्या कर्तव्यांबाबत माहिती आणि संविधान रचनेची ऐतिहासिक प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मान्यवरांनी संविधान हा देशाच्या विकासाचा पाया असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली तत्त्वे आचरणात आणून समाजातील ऐक्य, बंधुता आणि सौहार्द वाढवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीतर्फे उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले.
घुबडी ग्रामपंचायतीत झालेला हा उपक्रम लोकजागृतीचा उत्कृष्ट नमुना ठरला असून पुढील काळात अशाच उपक्रमांद्वारे संवैधानिक मूल्यांचा प्रसार करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला.









