✍️पांढरकवडा : अशफाक खान
स्थानिक गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर शाळेचे अध्यक्ष मदन जिड्डेवार, प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी, उपप्राचार्य अमित काळे, सहाय्यक शिक्षिका सुषमा ठमके उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून व कवितेच्या माध्यमातून प्राचार्य स्वप्नील कुळकर्णी यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाला लाभलेला कोहिनुर हिरा होय. बाबासाहेबांचे विचार परिसाप्रमाणे आहेत. ज्यांनी त्यांचे विचार अंगीकारले त्यांच्या जीवनाचे सोने झाले. बाबासाहेब जरी शरीररूपाने आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार नेहमी सोबत आहेत. ते विचाररूपाने अमर आहेत. असे प्रतिपादन केले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी शाळेतील संगीत शिक्षक रवींद्र शेंडे , विष्णू कोडापे व विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अप्रतीम गाणे सादर करुन स्वरांजली वाहिली. सुषमा ठमके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.







