✍️पांढरकवडा: अशफाक खान
शालेय शिक्षण विभाग, पंचायत समिती पांढरकवडा आणि इरा इंग्लिश मिडीयम स्कूल, पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ व ४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शारदा ज्ञानपीठ शाळेने उल्लेखनीय यशाची नोंद केली. संस्थेतील ९ वीतील हुशार विद्यार्थी देवांश भरत चिंचाळकर याने माध्यमिक गटात संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रभावी चमक दाखवून दिली.

त्याच्या अभिनव सादरीकरणाने परीक्षक मंडळाची वाहवा मिळवली असून या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर देवांशची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी झाली आहे. भविष्यात प्रगत वैज्ञानिक होण्याची क्षमता असलेल्या या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास या यशामुळे अधिक वृद्धिंगत झाला आहे.
या गौरवशाली कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष चाहल सर, मुख्याध्यापक श्री राहुल देवतळे, शाळा व्यवस्थापक तनवीर शेख सर, तसेच समस्त शिक्षकवृंद यांनी देवांशचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि संस्थेचे शैक्षणिक वातावरण यांचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात देवांशने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून विज्ञान विषयावरील आवड वाढविण्यासाठीही हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
अभिनंदन देवांश…
आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!







