✍️पांढरकवडा: अशफाक खान
पांढरकवडा बसस्टॅण्ड परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडलेल्या खिसेकापराच्या प्रयत्नात एका तरुणास नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. फिर्यादी भोजराज पांडुरंग राऊत (वय 38, रा. मोहदरी, ता. केळापूर) यांच्या खिशातील पाकीट चोरण्याचा प्रयत्न आरोपीने केल्याची घटना मंगळवारी (दि. 09 डिसेंबर 2025) घडली.
🎯 घटना कशी घडली?
फिर्यादी भोजराज राऊत हे पांढरकवडा येथील आपले काम आटोपून त्यांच्या सोबत असलेल्या गावातील मित्र प्रफुल मडावी यांच्यासह बसने गावाकडे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर थांबले होते. अंदाजे २० मिनिटे बसची प्रतिक्षा केल्यानंतर पांढरकवडा येथून यवतमाळकडे जाणारी बस येताच ते दोघे बसमध्ये चढू लागले.
याचवेळी एक अनोळखी युवक मागून आला आणि फिर्यादीच्या पॅन्टच्या मागील खिशातील ब्राऊन रंगाचे पाकीट काढण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने फिर्यादीने तात्काळ त्याचा हात पकडला.
🎯 प्रवाशांचे धाडस — आरोपीला पकडले
फिर्यादीची ओरड आणि गोंधळ लक्षात येताच बसमधील अन्य प्रवाशांनी तातडीने त्या युवकाला पकडून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आरोपीने आपले नाव साहील कैलास पुरी (वय 22, रा. सेवा नगर, वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच बसस्टॅण्डवरील कर्मचार्यांनी तत्काळ पांढरकवडा पोलीस ठाण्याला फोन करून कळविले. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनात आणले.
🎯 पोलीसांची तात्काळ कारवाई
या प्रकरणात
फिर्यादीची तक्रार नोंदवून आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 2025, कलम 303(2), 62 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
🎯 खिसेकापरांवर नागरिकांची सतर्कता महत्त्वाची — पोलीस प्रशासन
बसस्टॅण्ड, बाजारपेठांसारख्या गर्दीच्या ठिकाणी खिसेकापरांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना थांबविण्यासाठी नागरिकांची जागरूकता अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्थानिक पोलीस प्रशासनाने सांगितले. फिर्यादी व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपी रंगेहात पकडला गेला असून पोलीसांनी तत्पर कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.







