⛔पांढरकवड्यात नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर बनावट लिंक; शहरात खळबळ, सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा
✍️पांढरकवडा : अशफाक खान
शहरात सायबर गुन्हेगारांनी नवी युक्ती अवलंबत नागरिकांच्या व्हॉट्स ॲपवर ‘आरटीओ ई-चालान’ किंवा ‘एसबीआय रिवॉर्ड’ च्या नावाने एपीके (APK) फाइल व बनावट लिंक पाठवून मोबाईल हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीत आखाडा वॉर्डात राहणाऱ्या एका तरुणाच्या बँक खात्यातून जवळपास एक लाख ९२ हजार रुपये लंपास करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तुषार गणपतराव भोयर असे फसवणुकीचा बळी ठरलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे १ ते २ वाजताच्या दरम्यान तुषार भोयर यांच्या मोबाईलवर “RTO E-Challan-1 PKD” या नावाने एक लिंक/एपीके फाइल प्राप्त झाली. वाहनावर दंड (चलान) असावा, या समजुतीने त्यांनी ती लिंक उघडताच क्षणात त्यांच्या मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल झाले आणि मोबाईल पूर्णतः हॅक झाला.
यानंतर काही वेळातच त्यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांद्वारे एकूण १,९१,८२४ रुपये अज्ञात व्यक्तींनी परस्पर काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, केवळ या एकाच प्रकरणापुरते हे मर्यादित नसून, सध्या शहरातील अनेक नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर अशाच स्वरूपाचे फसवे मेसेज मोठ्या प्रमाणात येत असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये मोबाईल हॅक झाल्यानंतर संबंधित नागरिकांचे व्हॉट्सप खाते ताब्यात घेऊन त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींना त्याच नावाने बनावट मेसेज पाठवले जात आहेत. त्यामुळे फसवणुकीची साखळी वेगाने पसरत आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने वाढत असून दर आठवड्याला सरासरी ३ ते ४ तक्रारी नोंदवल्या जात आहेत. ठग प्रामुख्याने खासगी मोबाईल क्रमांक किंवा व्हॉट्सपचा वापर करून “वाहतूक नियमभंग दंड”, “ई-चलान भरा”, “रिवॉर्ड पॉइंट्स” अशा आकर्षक शीर्षकांखाली लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यास बनावट वेबसाइट उघडते किंवा थेट अनधिकृत एपीके फाइल डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. ही फाइल इन्स्टॉल होताच मोबाईलमधील ओटीपी, पासवर्ड, नेट बँकिंग व इतर संवेदनशील माहिती ठगांच्या हाती लागते आणि खात्यातील रक्कम काही मिनिटांत साफ होते.
या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंक किंवा एपीके फाइल डाउनलोड करू नये, आरटीओ किंवा बँकांच्या अधिकृत वेबसाइटशिवाय इतर कुठल्याही लिंकवर माहिती भरू नये, तसेच संशयास्पद मेसेज आल्यास त्वरित त्याकडे दुर्लक्ष करून पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पांढरकवड्यात यापूर्वीदेखील मोबाईल हॅक करून लाखो रुपये लंपास केल्याच्या घटना घडल्या असून, वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







