ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, वणी येथे ‘Technology Led Excellence in Teaching’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात संपन्न

On: December 25, 2025 5:37 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ तंत्रज्ञान, मूल्ये आणि मानवी संवेदनशीलतेच्या समन्वयातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा दृष्टिकोन

✍️वणी प्रतिनिधी :


शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते ज्ञान आणि गुणांची मोजदाद नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आहे, हा मूलमंत्र अधोरेखित करणारी “Technology Led Excellence in Teaching” या विषयावरील एक दिवसीय भव्य शिक्षक कार्यशाळा लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.


कार्यक्रमाची सुरुवात समाजप्रबोधन, स्वच्छता आणि शिक्षण या मूल्यांचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संत गाडगेबाबांचे विचार आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्थेलाही दिशादर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. त्यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना मानवी मूल्ये, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदल स्वीकारताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा, भावविश्वाचा व चारित्र्याचा विकास केंद्रस्थानी ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात नागपूर येथील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. हरिओम पुण्यानी यांनी “Excellence in Teaching” या विषयावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नसून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे शिल्पकार असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. अध्यापनात नाविन्य, संवेदनशील दृष्टिकोन, सकारात्मक संवाद आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षण यांचे महत्त्व त्यांनी प्रभावी शब्दांत अधोरेखित केले.


महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ संकल्पनेचा संदर्भ देत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ गुणांच्या आधारे न करता त्यांच्या कौशल्यांवर आधारित असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी शिकवण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे, तसेच बदलत्या काळानुसार डिजिटल साक्षर आणि तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अमरावती येथील डॉ. कौशिक जोशी यांनी “AI and Teaching Excellence” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व विविध डिजिटल साधनांच्या माध्यमातून शिक्षण अधिक जिवंत, रंजक, सहभागात्मक आणि भविष्योन्मुख कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण त्यांनी केले. AI चा योग्य वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करता येते, तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात सतत सकारात्मक संवाद असणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
संपूर्ण कार्यशाळा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक व सकारात्मक वातावरणात पार पडली. अभ्यासपूर्ण विषय मांडणी, स्पष्ट व रंजक सादरीकरण शैली आणि प्रभावी वक्तृत्वामुळे कार्यशाळेला उपस्थित शिक्षकांकडून मोठा प्रतिसाद लाभला.


या शिक्षक कार्यशाळेत लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसह शहरातील मॅकरून स्टुडंट अकॅडमी, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल, संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, सुशगंगा पब्लिक स्कूल, माकंडेय पोद्दार लर्न स्कूल आणि न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा प्रकारच्या कार्यशाळांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रभावी संचालन सौ. पंपा मित्रा यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी मांडले, तर डॉ. अभिजित अणे यांनी आभार प्रदर्शन केले.


समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने मान्यवर वक्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, लायन्स शाळेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, लायन प्रमोद देशमुख, लायन पुरुषोत्तम खोब्रागडे, लायन किशन चौधरी, लायन महेंद्र श्रीवास्तव, लायन डॉ. विजय राठोड, लायन वीणा खोब्रागडे, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार, शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे आणि प्राचार्य चित्रा देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.


शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देणारी ही कार्यशाळा वणीच्या शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा, नवा दृष्टिकोन आणि नवचैतन्य देणारी ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment