✍️पांढरकवडा | अशफाक खान
केळापूर गावाच्या हद्दीबाहेर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उडानपुलाच्या बांधकामामुळे चक्क शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि.20 जानेवारी मंगळवारी केळापुरात अभूतपूर्व असे विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहायला मिळाले. सुरक्षित अंडरपास (बोगदा) उपलब्ध करून देण्यात यावा, या ठाम मागणीसाठी लहान मुले हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरली, ही बाब संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
केळापूर गावाबाहेर उडानपुलाचे काम सुरू असल्यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी थेट राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागत आहे. जड वाहनांची सतत वर्दळ असलेल्या या मार्गावरून दररोज लहान मुलांना चालत जावे लागणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. सध्या विद्यार्थ्यांना सुमारे २०० मीटर अंतर पायी चालून महामार्ग ओलांडावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा २०० मीटरचा वळसा घालून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचावे लागते. यामुळे वेळेचीही नासाडी होत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
ही परिस्थिती केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही चिंताजनक ठरत आहे. “एखादी दुर्घटना घडल्यावर जाग येणार का?” असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे. सुरक्षित पर्यायी मार्ग नसल्याने आणि कोणतीही तात्पुरती व्यवस्था न केल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून फेरा काढत थेट उडानपुलाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन जोरदार आंदोलन केले. हातात फलक, तोंडात घोषणा आणि डोळ्यात भीती घेऊन विद्यार्थ्यांनी आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली.
“आम्हाला अंडरपास (बोगदा) द्या, अन्यथा हा उडानपूल नकोच,” अशी ठाम आणि एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
अंडरपासची सुविधा उपलब्ध झाल्यास शाळकरी विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावाची ये-जा सुरक्षित होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांसाठीही अंडरपास अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे म्हणजे, ही मागणी काही नवीन नाही. यापूर्वीही केळापूर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार राजू तोडसाम, खासदार प्रतिभा धानोरकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकर यांना निवेदने सादर केली आहेत. वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्येची जाणीव करून देण्यात आली. मात्र, इतक्या प्रयत्नांनंतरही अंडरपासच्या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अंडरपासच्या मागणीवर ठोस निर्णय जाहीर न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे. “आमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, यावर तात्काळ निर्णय झाला नाही तर आंदोलन वाढवले जाईल,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
केळापूरचा उडानपूल विकासाचे प्रतीक ठरणार की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अडथळा ठरणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.









