ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती वणीत उत्साहात साजरी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचा उपक्रम

On: February 7, 2026 4:11 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी :प्रतिनीधी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती अत्यंत श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. या कार्यक्रमाला मंचाचे पदाधिकारी बंडू कांबळे, संजय तेलंग, घनश्याम ठमके, प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांच्यासह नगरसेविका करुणा कांबळे यांनीही पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांना अभिवादन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संकटांची मालिका जणू माता रमाई यांच्या आयुष्यात कायमच लागलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ जवळ वनद गावामध्ये  १८९८ साली रमाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बंदरावरून डोक्यावर मासोळ्या आणून विक्री करीत, तर आई शेण गोळा करून गोवऱ्या बनविणे व विक्री करण्याचे काम करीत असे. कठोर परिश्रमामुळे आई-वडिलांचे एकामागून एक निधन झाले.
यानंतर रमाई आपल्या लहान बहीण-भावासह, शंकरसह मुंबईतील भायखेडा येथे काका वलंगकर व मामा गोविंदपुरकर यांच्याकडे राहायला आल्या. काकूच्या घरातील प्रत्येक कामात रमाई मनापासून हातभार लावत असत. अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला. मात्र लग्नानंतरही दुःखाची मालिका संपली नाही.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध सामाजिक चळवळी व आंदोलनांमध्ये सक्रिय असताना माता रमाई यांना त्यांची कायम चिंता वाटत असे. महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन असो, बडोदा येथे बाबासाहेबांवर झालेला हल्ला असो, किंवा पुणे करारामुळे येणाऱ्या धमक्या व शिवीगाळ करणारी पत्रे – या सर्व प्रसंगांनी रमाईंचे काळीज अक्षरशः फाटून जात असे. या प्रसंगातील त्यांची चिंता शब्दात मांडणे अशक्य असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

१९२५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडहून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर त्यांचे मोठे बंधू बळीराम यांनी कुटुंबातील सर्वांसाठी नवीन कपडे घेतले व माता रमाई यांनाही चांगले पातळ घेण्यासाठी पैसे दिले. मात्र त्या पैशांतून स्वतःसाठी काहीही न घेता माता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी धोतर-जोडी, गादी व जेवणासाठी पाट खरेदी केला. शहाजी महाराजांनी दिलेला पटका परिधान करून त्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या. हा प्रसंग आजच्या भगिनींनी विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखा असल्याचे त्यांनी नमूद केले.

१९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जात असताना माता रमाई त्यांना निरोप देण्यासाठी बंदरावर आल्या. त्यावेळी रमाई यांची तब्येत ठीक नसल्यामुळे बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना त्यांना धारवाडच्या हॉस्टेलमध्ये नेण्यास सांगितले, जेणेकरून मोकळ्या वातावरणात त्यांना बरे वाटेल. धारवाड येथे आल्यानंतर  एक दिवस सर्वजण उपाशी असल्याचे रमाईंना समजले. चौकशी केल्यानंतर कळले की अनुदान आलेले नव्हते व दुकानदारांनी उधारीवर धान्य देण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत माता रमाई यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून धान्य, तेल व मीठ खरेदी करण्यास सांगितले. हा प्रसंग त्यांच्या त्याग, समर्पण व त्यागमूर्ती व्यक्तिमत्त्वाचे जिवंत उदाहरण असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

माता रमाई आंबेडकर यांना केवळ ३७ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले. २७ मे १९३५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या त्यागाचे, सहनशीलतेचे व संघर्षाचे स्मरण आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे संचालन बंडू कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन घनश्याम ठमके यांनी केले. कार्यक्रमाला संजय तेलंग, रामदास कांबळे, पुंजाराम भादीकर, वसंत नगराळे, विजय नगराळे, कवडू जीवने, पुंडलिक पथाडे, अशोक पळवेकर, गंगाराम रामटेके, विवेक तेलंग, नगरसेविका करूणा कांबळे, रवी कांबळे, दादाजी घडले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याला अभिवादन करून सामाजिक समतेच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणीत तिथीनुसार शिवजयंतीचा ऐतिहासिक जल्लोष; मनसेकडून भव्य तयारी, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह लेझर शोने रंगणार शिवकाल

वणीत ‘अपर जिल्हाधिकारी’ तर शिरपूरला ‘अपर तहसील’ कार्यालयाची जोरदार मागणी; मनसे नेते राजू उंबरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत मालवली श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन

गुणवत्तेचा कापूस नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला — वणी बाजार समितीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

शिवगर्जनेत दुमदुमले लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल; विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

धुलिवंदना निमित्त वणीमध्ये रंगणार भव्य हास्य कवी संमेलन; देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती

Leave a Comment