✍️पांढरकवडा : अशफाक खान
घाटंजी तालुक्यातील घोटी गावात सुरू असलेल्या लग्नाच्या आनंदावर अचानक काळाने घाला घालत हृदयद्रावक घटना घडली. उद्या होणाऱ्या काकाच्या लग्नाच्या तयारीदरम्यान झालेल्या अपघातात १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटी येथील तमीर बहोद्दीन काझी यांच्या घरी दि. २९ एप्रिल रोजी विवाह सोहळा पार पडणार आहे. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
लग्नाच्या तयारीसाठी आवश्यक असलेले ‘चौरंग पाट’ आणण्यासाठी आफाक निजामुद्दीन काझी (वय १५) हा आपल्या दोन साथीदारांसह दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या बैलाने जोरदार धडक दिली. या अपघातात आफाक हा दुचाकीवरून खाली पडून बैलाखाली दबला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत आफाकला शासकीय रुग्णालय, घाटंजी येथे उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या अपघातात उबेद जमीर खान पठाण आणि सपान आसिफ काझी (वय १२) हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी तातडीने यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, घाटंजी येथील समाजसेवक मुज्जू पटेल व त्यांच्या मित्रपरिवाराने तत्परता दाखवत जखमींना मदत केली आणि घटनेची माहिती घाटंजी पोलीस तसेच पारवा पोलीस ठाण्याला दिली. घटनेनंतर घाटंजी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिनेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून सविस्तर अहवाल पारवा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस करत आहेत. दरम्यान, लग्नाच्या उंबरठ्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे काझी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नाचा आनंद एका क्षणात शोकात परिवर्तित झाल्याने वातावरण सुन्न झाले आहे.
( AI generated photo )








