⛔ मुख्याधिकारी गैरहजर, प्रशासनाविरोधात तीव्र रोष; कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी
✍️पांढरकवडा : अशफाक खान
चक्रीवादळामुळे पांढरकवडा शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थितीनंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ युवा टायगर फोर्सच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात धडक देत प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने लिपिक सुरज राठोड यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी नगराध्यक्ष आतिश बोरेले व उपनगराध्यक्ष आतिश चव्हाण उपस्थित होते. संतप्त पदाधिकाऱ्यांनी शहरातील वास्तव परिस्थिती प्रशासनासमोर मांडत जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

चक्रीवादळाला तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही शहरातील अनेक भागांत पडलेली झाडे, तुटलेल्या फांद्या, रस्त्यांवरील कचरा, बंद पडलेले पथदिवे, विस्कळीत स्वच्छता व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या कायम असल्याचे युवा टायगर फोर्सने निदर्शनास आणून दिले. नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असताना प्रशासनाकडून अत्यंत संथ गतीने कामे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे एवढी गंभीर आपत्तीजन्य परिस्थिती असतानाही मुख्याधिकारी शहरात उपस्थित नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. अशा प्रसंगी मुख्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच पांढरकवडा नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा, अशी ठाम मागणी युवा टायगर फोर्सने केली.
युवा टायगर फोर्सच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी रैवाह डोंगरे यांनाही स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षी कारभाराची माहिती देऊन संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष वेधले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाने दाखविलेल्या उदासीनतेची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, महावितरण कंपनीने आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १३ आपत्कालीन पथके राबवून अवघ्या दोन दिवसांत शहरातील बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शहरवासीयांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
याउलट नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता, रस्ते मोकळे करणे, झाडे हटविणे, पथदिवे सुरू करणे व इतर नागरी सुविधांबाबत अपेक्षित वेगाने काम न केल्यामुळे शहरभर तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, आपत्तीच्या काळात प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असताना अनेक ठिकाणी निष्क्रियता दिसून आली.
निवेदनात शहरातील सर्व पडलेली झाडे तात्काळ हटविणे, विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, नाल्यांची साफसफाई करणे, सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे, आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेणे आणि परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत विशेष पथके कार्यरत ठेवण्याची मागणी करण्यात आली.

नगराध्यक्ष आतिश बोरेले यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून शहरातील पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदिवे व इतर नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रमुख उपस्थिती मदन जिड्डेवार, अंकित नैताम, संजय झोटिंग, रितेश परचाके, मनोज भोयर, प्रेमराव वखरे, सागर व्यास, संजय औदर्य, संतोष पेंढारवार, प्रदीप नारनवरे, गणेश बोरकुटे, सतीश जाधव, प्रा. अमर वंजारी, राम भेंडारे, डॉ. किरण माई, मकरंद साने, सुविधी पारख, अनिकेत मिसाळ, विवेक कंठकुंठलावार, रामचंद्र अडते, संजय चन्नावार, शुभम वरगंटवार, संतोष पवार यांच्यासह युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








