ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मार्डा डॅम हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; महिलेच्या छेडछाडीच्या रागातून तरुणाचा खून, तीन आरोपी जेरबंद

On: June 8, 2026 1:19 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️मारेगाव: अशफाक खान

दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात जंगलातील खड्ड्यात फेकून दिलेल्या एका अनोळखी कुजलेल्या मृतदेहाचे गूढ अवघ्या २४ तासांत उकलून मारेगाव आणि शिरपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविणे हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र घटनास्थळी सापडलेले काही किरकोळ पुरावे, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ मृतकाची ओळखच पटली नाही, तर खुनामागील कारण आणि आरोपींचाही पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून महिलेच्या छेडछाडीचा राग मनात धरून संगनमताने हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

🎯 जंगलातील खड्ड्यात सापडला कुजलेला मृतदेह

दि. ५ जून रोजी दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरातील जंगलात एका खड्ड्यात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह बराच काळ जंगलात पडून असल्याने त्याची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

घटनास्थळी सहायक फौजदार दिगंबर किनाके, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. मृतदेहाच्या आजूबाजूच्या परिसराची तपासणी करताना पोलिसांना एक तंबाखूची प्लास्टिक डबी आणि पांढऱ्या धातूचे (चांदीचे) कडे मिळून आले. सामान्य वाटणारे हे पुरावेच पुढे संपूर्ण प्रकरण उलगडण्यास कारणीभूत ठरले.

🎯 चांदीचे कडे आणि तंबाखूची डबी ठरली तपासाची किल्ली

पोलीसांनी घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास केला. त्यांनी मृतकाच्या अंगावरील वस्तू आणि मिळालेल्या पुराव्यांचे फोटो काढून विविध गावांमध्ये चौकशी सुरू केली. तसेच परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली.

अखंड प्रयत्न आणि तपास कौशल्याच्या जोरावर मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हादराव सहारे (वय ३५, रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटली. मृतकाची ओळख पटताच तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि खुनामागील सूत्रे एकामागोमाग एक उलगडू लागली.

🎯 तांत्रिक तपासातून संशयितांपर्यंत पोहोचले पोलीस

दरम्यान, शिरपूर पोलीस ठाण्याने स्वतंत्रपणे तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारे काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

मारेगाव पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि शिरपूर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाची सांगड घालत संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांनी अखेर पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

🎯 महीलेच्या छेडछाडीच्या रागातून रचला खुनाचा कट

तपासात धक्कादायक बाब समोर आली. मृतक विनोद सहारे हा यातील एका आरोपीच्या बहिणीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. याच रागातून विनोदचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचण्यात आला.

तिघांनी संगनमत करून विनोदला जाळ्यात ओढण्याचे नियोजन केले. दि. ३ जून रोजी त्याला वरोरा रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकीवर बसवून मार्डा डॅमच्या निर्जन जंगल भागात नेण्यात आले. तेथे आधीच आखलेल्या योजनेनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला.

खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जंगलातील खड्ड्यात फेकून दिला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने गुन्हा लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांच्या सतर्क तपासामुळे त्यांचा हा डाव फसला.

🎯 अटक करण्यात आलेले आरोपी

या प्रकरणी पोलिसांनी खालील तीन आरोपींना अटक केली आहे :

🔺प्रविण अशोक वरधने (रा. आपटी, ता. मारेगाव)

🔺राजू नथ्थुजी ढेंगळे (रा. दांडगाव, ता. मारेगाव)

🔺शंतनू झाडे (रा. नागरी, ता. वरोरा)

आरोपींविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🎯 २४ तासांत उलगडा; पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

अत्यंत क्लिष्ट आणि अंधाऱ्या स्वरूपाच्या या खुनाच्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात मारेगाव आणि शिरपूर पोलिसांना यश मिळाले. मृतदेहाची ओळख नसताना केवळ घटनास्थळी मिळालेल्या किरकोळ पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेणे हे मोठे आव्हान होते. मात्र तपास पथकाने समन्वय, तांत्रिक माहिती आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या बळावर आरोपींपर्यंत मजल मारली.

या यशस्वी कारवाईत मारेगावचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे, सहायक फौजदार दिगंबर किनाके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, पोलीस शिपाई सागर दीपेवार, राजन इसंकर तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस हवालदार इकबाल शेख आणि अजय वाभिटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय तपासामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

लग्नाच्या महिनाभरातच नवदाम्पत्याची हृदयद्रावक आत्महत्या; पोटाला दगड बांधून विहिरीत उडी, सग्नापूर शोकसागरात

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात, मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार; ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक धडकेने मारेगाव पंचायत समिती हादरली, खंडणी गावातील दूषित पाणीप्रश्न्नी प्रशासनाला जाग; चौकशी समिती गठीत, नवीन बोरवेलचे आदेश

करणवाडी–कुंभा रोडवर अवैध गॅस सिलेंडर वाटप प्रकरण उघड; 4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त,  गॅस वितरक आणि  वाहन चालकावर  गुन्हा दाखल

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त;  मारेगाव घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Leave a Comment