ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

केगावच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित एसटी बससेवा सुरू करा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन

On: August 13, 2026 3:49 PM
Follow Us:
---Advertisement---

शाळा-महाविद्यालयांच्या वेळेनुसार बसफेऱ्यांची मागणी; विद्यार्थ्यांची गैरसोय व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

✍️मारेगाव :  प्रतिनीधी


मारेगाव तालुक्यातील मौजा केगाव (वे.) येथील विद्यार्थ्यांची दररोजची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी गावातून नियमित एसटी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे. याबाबत वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून, मागणीची तातडीने दखल न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

केगाव येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मारेगाव शहर तसेच परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ये-जा करतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयीन वेळेनुसार गावातून नियमित व पुरेशी एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या वेळेत शाळा किंवा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी तसेच दुपारी किंवा सायंकाळी घरी परतण्यासाठी योग्य बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

एसटी बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करताना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मनसेने निवेदनातून नमूद केले आहे.

🎯 शाळा-महाविद्यालयांच्या वेळेनुसार बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केगाव ते मारेगाव आणि परतीच्या मार्गावर शाळा व महाविद्यालयांच्या वेळेनुसार नियमित एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी फाल्गुन गोहोकार यांनी आगार व्यवस्थापनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या, शाळा-महाविद्यालयांच्या वेळा आणि स्थानिक प्रवाशांची गरज लक्षात घेऊन योग्य वेळापत्रक तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वाहतुकीची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केगावच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून तो त्यांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.

🎯 मागणी दुर्लक्षित केल्यास आंदोलनाचा इशारा

“प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि सुरक्षेचा विचार करून तातडीने योग्य वेळापत्रकासह केगाव येथे एसटी बससेवा सुरू करावी. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्याची वेळ येऊ नये. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आगार प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील,” असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला.

निवेदन देतेवेळी प्रवीण कळस्कर, धीरज पेचे, प्रफुल गाडगे, धीरज भगवा, सुनील टोंगे, तसेच कलावती टोंगे, उमा पिंपळकर, पूजा ठावरी, दिपाली आवारी, सुनिता पानघाटे, नीलिमा पानघाटे, वैशाली मरसकोल्हे, दिशा लडके, गंगु टोंगे, रेणुका वासेकर, वैशाली ठावरी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आता वणी आगार प्रशासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि केगावच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा कधी सुरू होते, याकडे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment