⛔मारेगाव-वणी राज्यमार्गावर थरारक अपघात; गंभीर जखमी शुभम ठावरीला चंद्रपूरला हलविले
✍️मारेगाव : अशफाक खान
मारेगाव-वणी राज्यमार्गावर खाडे फार्महाऊसजवळ, गौराळा फाट्याच्या परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा डावा हात दंडापासून अक्षरशः अलग झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली.
शुभम रवींद्र ठावरी (वय २५) रा. आष्टी ता वरोरा जि. चंद्रपूर असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा मारेगाव येथे फायनान्सचे काम आटोपून दुचाकीने वरोऱ्याच्या दिशेने परत जात होता. दरम्यान, खाडे फार्महाऊसजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. शुभमच्या दुचाकीची या उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली.

🎯 धडक इतकी भीषण की हात झाला अलग
दुचाकीची ट्रकला झालेली धडक इतकी जबरदस्त होती की शुभमच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि हात दंडापासून वेगळा झाला. या भीषण दृश्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातानंतर जखमी शुभमला तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
🎯 प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जखमी शुभमला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने आणि पुढील अत्यावश्यक उपचारांची गरज असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुभमला अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
🎯 पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. मारेगाव पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसन संकुलवार पुढील तपास करीत आहेत.












