⛔चिमुकल्यांनी साकारल्या क्रांतिकारकांच्या भूमिका; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले
✍️वणी: प्रतिनीधी
लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (देशमुखवाडी) येथे क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव तसेच आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या शौर्य, त्याग आणि देशप्रेमाला उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते केजी-२च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले ‘क्रांतिकारकांची वेशभूषा’ स्पर्धा. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारक व महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. तसेच संबंधित महापुरुषांची प्रसिद्ध वचने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला.
यावेळी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, जीवनपद्धती आणि समाजाच्या विविध क्षेत्रांतील योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. आदिवासी समाजाचे हक्क, त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि विविधतेतून निर्माण होणारे सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ऑगस्ट क्रांती आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तिचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि संघर्ष भावी पिढीने जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण रोहिणी गोरंटीवार आणि मृणाल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्चना रेडलावार यांनी केले, तर स्नेहा पारोधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांची सांगड घालत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.








