ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

धरणे, तलावांच्या ५ किमी परिसरात पर्यटनाला बंदी!

On: August 19, 2026 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

पाच दिवसांत पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर प्रतिबंधात्मक आदेश

✍️यवतमाळ : अशफाक खान

यवतमाळ जिल्ह्यातील धरणे, तलाव, नदी आणि जलाशयांच्या ठिकाणी वाढती पर्यटकांची गर्दी आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या जलदुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या परिसरातील ५ किलोमीटरचा परीघ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ३० व ३४ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात मोठे ३, मध्यम ७ आणि लघु ६३ असे एकूण ७३ जलप्रकल्प आहेत. सध्या या प्रकल्पांमध्ये सुमारे ७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी निळोणा प्रकल्प, येळाबारा धबधबा, बोरगाव प्रकल्प, बेंबळा प्रकल्प यांसह विविध जलस्थळांवर सुट्टीच्या आणि सणासुदीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

मात्र, या पर्यटनाच्या उत्साहाला गेल्या काही दिवसांत दुर्घटनांचे गालबोट लागले आहे. बोरगाव प्रकल्प आणि टाकळी प्रकल्प येथे मागील पाच दिवसांत पाण्यात बुडून पाच शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वारंवार सूचना देऊनही नदी, तलाव, धरणे, ओढे आणि नाल्यांमध्ये पोहणे, धोकादायक ठिकाणी जाणे, सेल्फी काढणे अथवा रील बनविण्याचे प्रकार सुरूच असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

🎯 ५ किलोमीटर परिसरात पर्यटन, पिकनिकला बंदी

नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या परिसरातील ५ किलोमीटरचा भाग प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे. या परिसरात पर्यटनासाठी जाणे, पिकनिक करणे किंवा अनावश्यक गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

🎯 पाण्यात उतरणे, बोटिंगवरही निर्बंध

धरण, तलाव, नदीकाठ आणि पाणलोट क्षेत्रात पोहणे, बोटिंग करणे, कपडे धुणे तसेच जनावरांना पाण्यात उतरविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पाण्याची खोली, प्रवाह आणि जलाशयातील बदलत्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🎯 सेल्फी, रील्स काढणाऱ्यांवर करडी नजर

ओव्हरफ्लो होणारे बंधारे, पूल, धरणाचे सांडवे तसेच इतर धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. सोशल मीडियासाठी रील किंवा व्हिडिओ तयार करण्याच्या नादात नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

🎯 अनावश्यक वाहतुकीवरही नियंत्रण

धरणे आणि तलावांच्या दिशेने जाणाऱ्या ५ किलोमीटर परिसरातील रस्त्यांवर विनाकारण प्रवास करणे अथवा वाहने उभी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

🎯 आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई

१८ ऑगस्ट २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या, हुल्लडबाजी करणाऱ्या किंवा सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांतील जलदुर्घटनांनी जिल्ह्यातील जलस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत आणि धरणे, तलाव व नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

टाकळी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; चार दिवसांत पाच जणांचा जलसमाधी

तीन महिन्यांत एसीबीच्या चार धडक कारवाया; यवतमाळ जिल्हयातील लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Leave a Comment