ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

गोवंश कत्तलीच्या प्रयत्नावर पांढरकवडा पोलिसांचा छापा; एक गोवंश व टाटा इंडिका जप्त

On: September 12, 2026 2:05 PM
Follow Us:
---Advertisement---

१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

✍️पांढरकवडा : अशफाक खान

गोपनीय माहितीच्या आधारे पांढरकवडा पोलिसांनी तातडीची कारवाई करत गोवंश कत्तलीच्या प्रयत्नाचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत एक गोवंश तसेच त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका कार असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील मोमिनाबाद कॉलनी परिसरातील तारीक उर्फ बबलू कुरेशी याने टाटा इंडिका वाहनातून गोवंशाची वाहतूक करून आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला तो कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवला आहे.

या माहितीची गंभीर दखल घेत पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान संबंधित आरोपी गोवंश कत्तलीच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत २५ हजार रुपये किमतीचा एक गोवंश तसेच गोवंशाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे टाटा इंडिका वाहन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अप. क्र. ११५५/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(अ), ९(ब), ९ व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राहुल भगत करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि एसडीपीओ रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, हेड कॉन्स्टेबल रजनीकांत पाटील, पोलीस कर्मचारी गौरव नागरकर व विजय राऊत यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment