⛔ पांढरकवडा पोलिसांची NH-44 वर कारवाई; ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
✍️पांढरकवडा | अशफाक खान
अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई करत ९ गोवंशांची सुटका केली असून, पिकअप वाहनासह एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील धारणा उड्डाणपुलाजवळ करण्यात आली. दरम्यान, वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे हे पोलीस पथकासह NH-44 नागपूर–हैदराबाद महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना सकाळी सुमारे ७ वाजता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. एका पिकअप वाहनातून गोवंश कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेण्यात येत असल्याचे तसेच धारणा उड्डाणपुलाजवळ सदर वाहन अपघातग्रस्त झाल्याचे पोलिसांना समजले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचांसमक्ष पिकअप वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये ५ बैल आणि ४ गोरे, असे एकूण ९ गोवंश आढळून आले. मात्र, वाहनचालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या कारवाईत ९ गोवंशांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये, पिकअप वाहन क्रमांक MH-36-AA-0032 ची किंमत २ लाख ५० हजार रुपये आणि एक मोबाईल फोन किंमत १५ हजार रुपये, असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अप. क्र. 1167/2026 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमातील कलम ११(१)(घ), (च), (ज), (झ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, हेड कॉन्स्टेबल रजनीकांत पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंदन गोदरे यांनी केली.









