✍️पांढरकवडा: अशफाक खान
गणेश स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण तसेच वाहनांच्या नियमभंगाविरोधात पांढरकवडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत डीजे व साऊंड सिस्टीम घेऊन जाणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली होती. वाहनांची कागदपत्रे, चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तसेच वाहनांच्या मॉडिफिकेशनसंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दोन्ही वाहने मोटार वाहन कायद्याच्या कलम २०७ अन्वये डिटेन केली होती. या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन विभाग, यवतमाळ यांनी तपासणी करून दोन्ही वाहनांवर एकूण ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश स्थापना दिनी पांढरकवडा पोलिसांकडून वाहनांची तपासणी व नियमबाह्य डीजेच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी कारवाई करण्यात येत होती. यावेळी एमएच ०१ सीव्ही ९९७८ आणि एमएच ०२ सीई ४५६७ या दोन वाहनांमध्ये डीजे वाद्यसामग्री आढळून आली. त्यामध्ये दोन बेस, दोन टॉप, दोन स्पार्क लाईट, साऊंड सिस्टीम तसेच इतर साहित्याचा समावेश होता.
तपासणीदरम्यान संबंधित वाहनांकडे आवश्यक मूळ कागदपत्रे, चालकाचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन मॉडिफिकेशन सर्टिफिकेट उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहने मोटार वाहन कायदा कलम २०७ अंतर्गत डिटेन केली. त्यानंतर वाहनांच्या कागदपत्रांची आणि नियमपालनाची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी पांढरकवडा पोलिसांकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला.
यानंतर दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी उपप्रादेशिक परिवहन विभाग, यवतमाळ येथील अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली. तपासणीअंती नियमभंगाच्या प्रकरणात दोन्ही वाहनांवर मिळून एकूण ३३,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या निर्देशनानुसार करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, सहायक फौजदार प्रमोद जुनुनकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव , पोलीस नाईक सुनील राठोड , सचिन काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्यलवार यांनी सहभाग घेतला.








