⛔ यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचा स्तुत्य उपक्रम; जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
✍️वणी : महेश टिपले
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याच्या उद्देशाने यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने ‘एक वही, एक पेन’ हा अभिनव सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून संकलित करण्यात आलेल्या वह्या व पेनचे वाटप २१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ४, वणी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, आत्मविश्वास वाढावा आणि आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. ‘एक वही, एक पेन’ या छोट्याशा संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
🎯 महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष शिंदे सर होते. विशेष उपस्थिती म्हणून वणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक सैफूरभाई रहेमान उपस्थित होते. यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे मार्गदर्शक हेमंतकुमार टिपले सर यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून विनोद चव्हाण सर, प्रभाकर ब्रह्मटके सर, रवींद्र तोंडे सर आणि अनुराग नागदिवे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे सदस्य रज्जत भरत सातपुते यांनी केले. तर रवींद्र तोंडे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे आभार मानले.
यावेळी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे सदस्य प्रेम अडकिने, गौरव जवादे, आदित्य वाळके आणि इस्माईल खान यांचीही उपस्थिती होती.
🎯 शिक्षणाला प्राधान्य देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
यावेळी अध्यक्ष संतोष शिंदे सर, नगरसेवक सैफूरभाई रहेमान, प्रमुख वक्ते हेमंतकुमार टिपले सर तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला जीवनातील सर्वोच्च प्राधान्य देत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा. ज्ञान, मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या बळावर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले.
समाजातील प्रत्येक घटकाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केवळ शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या मनात ‘शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे आणि समाजासाठी योगदान दिले पाहिजे’ ही प्रेरणा निर्माण करणे हा त्यामागील व्यापक हेतू असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
🎯 सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश
यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित करत समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज या उपक्रमातून व्यक्त झाली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या मनात निर्माण झालेला उत्साह हा या उपक्रमाचा विशेष ठरला. सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रोत्साहन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार या तिन्ही बाबींचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.











