ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीच्या ‘ज्ञान ज्योत’चा मुंबईत डंका; तीन प्रतिष्ठित श्रेणींत पुरस्काराची मोहोर

On: October 20, 2026 5:00 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ सर्वोत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक संदेश आणि सर्वोत्कृष्ट लघुपट अशा तीनही श्रेणींत उल्लेखनीय यश; २० ऑक्टोबरला अधिकृत युट्युब चॅनलवर प्रदर्शित

✍️वणी : महेश टिपले

वणीच्या कलाक्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून, येथील अक्षय रामटेके फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘ज्ञान ज्योत’ या शॉर्ट फिल्मने मुंबईत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. वणीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या या पुरस्कारविजेत्या लघुपटाची तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विजेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे वणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘ज्ञान ज्योत’ या लघुपटाची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपट, सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा लघुपट आणि सर्वोत्कृष्ट लघुपट या तीन महत्त्वपूर्ण श्रेणींमध्ये विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे. शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचा प्रभावी संगम साधणाऱ्या या कलाकृतीला मिळालेले हे यश निर्माते, कलाकार आणि संपूर्ण वणीकरांसाठी गौरवास्पद मानले जात आहे.

या लघुपटाची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन अक्षय रामदास रामटेके यांनी केले आहे. लघुपटाच्या प्रमुख भूमिकेत मंगेश गोहोकार आणि सीमा मुळे यांनी प्रभावी अभिनय साकारला आहे. त्यांच्या अभिनयासोबतच कथा, दिग्दर्शन आणि निर्मितीच्या दर्जामुळे ‘ज्ञान ज्योत’ने प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

लघुपटाच्या निर्मितीमध्ये को-प्रोडक्शन प्रोड्यूसर म्हणून संजय कालर, तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून हर्षद प्रमोद गहुकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाला मोंक स्टुडिओ यांनी संगीताची साथ दिली असून, या लघुपटाला श्री जल सोलर यांचे मोलाचे प्रायोजकत्व लाभले आहे.

🎯 २० ऑक्टोबरपासुन प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईत पुरस्काराची मोहोर उमटवल्यानंतर आता ‘ज्ञान ज्योत’ हा लघुपट थेट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हा लघुपट अक्षय रामटेके यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येणार. त्यामुळे वणीसह परिसरातील कलाप्रेमी आणि लघुपट रसिकांमध्ये या प्रदर्शनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

🎯 सहकार्य करणाऱ्यांचे विशेष आभार

‘ज्ञान ज्योत’च्या यशामागे अनेकांचे योगदान असून, लघुपटाच्या निर्मितीपासून ते अंतिम टप्प्यापर्यंत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल रमेश तामगाडगे सर आणि निकेश भोस्कर सर यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

शिक्षण आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘ज्ञान ज्योत’ला मिळालेले हे यश वणीतील स्थानिक कलाकार आणि निर्मात्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या व्यासपीठावर वणीच्या कलाकृतीने तीन श्रेणींमध्ये मिळवलेले यश हे वणीच्या कलाक्षेत्राची वाढती झेप अधोरेखित करणारे ठरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment