ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सायखेडा धरणातील पाणीसाठा जपण्यासाठी पांढरकवडा पालिकेचा मोठा निर्णय

On: October 22, 2026 2:06 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ आता ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा; आगामी टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन

✍️पांढरकवडा : सफी खान


उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच शहरात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध जलसाठा आगामी काळात नागरिकांना पुरेसा उपलब्ध राहावा, यासाठी पांढरकवडा नगर परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायखेडा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 23 ऑक्टोंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.

सध्या शहरात नियमितपणे दररोज पाणीपुरवठा सुरू असला, तरी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता आगामी उन्हाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. भविष्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्याची वेळ येऊ नये, तसेच नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

🎯 नगर परिषदेत पाणीपुरवठ्यावर विशेष आढावा बैठक

शहराच्या पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नुकतीच पांढरकवडा नगर परिषदेच्या सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनु बोरेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, सायखेडा धरणातील उपलब्ध जलसाठा, पाणी वितरण व्यवस्था, पाणीगळतीमुळे होणारा अपव्यय तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणीटंचाई यावर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती अतिश चव्हाण, मुख्याधिकारी पंकज गावंडे, सर्व प्रभागांचे नगरसेवक तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

🎯 प्रभागनिहाय अडचणींवरही चर्चा

बैठकीदरम्यान विविध प्रभागांतील नगरसेवकांनी आपल्या भागातील पाणीपुरवठ्याच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत होणारा फरक, उंच-सखल भागातील वितरणातील अडचणी तसेच शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत समान पाणी पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पाण्याचे योग्य नियोजन करून शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करताना पाणी वितरणात कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केल्या.

🎯 दररोजच्या पाण्याऐवजी आता एक दिवसाआड पुरवठा

नगर परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, याच पद्धतीने पाणीपुरवठा सुरू राहिल्यास धरणातील जलसाठा अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अचानक आणि मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्यापेक्षा आतापासूनच नियोजित पद्धतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा करून जलसाठा वाचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियोजनामुळे उपलब्ध पाणी अधिक काळ टिकवून ठेवता येईल आणि उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल, अशी अपेक्षा नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे.

🎯 ‘पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा’

मुख्याधिकारी पंकज गावंडे यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले. ते म्हणाले की, सायखेडा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. धरणातील पाणी अत्यंत काटकसरीने वापरून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकविणे हे नगर परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सध्या शहरात दररोज पाणीपुरवठा होत असला तरी नियोजनाचा भाग म्हणून येत्या 23 ऑक्टोबर पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांची कमीतकमी गैरसोय होईल, यासाठी पाणी वितरणाचे योग्य नियोजन केले जाईल. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

🎯 गळती रोखण्यासह पाणी बचतीवर भर

एकीकडे पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच दुसरीकडे पाणीगळतीमुळे होणारा अपव्यय रोखणे, उपलब्ध पाण्याचे योग्य वितरण करणे आणि गरजेनुसार पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करणे, या बाबींवरही नगर परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी पालिकेने जलसाठ्याचे नियोजन, वितरण व्यवस्था आणि नागरिकांचा सहभाग या तिन्ही बाबींना महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे.

🎯 नागरिकांसाठी आवाहन

नगर परिषदेच्या या निर्णयामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवताना अनावश्यक वापर टाळावा, घरगुती कामांमध्ये पाण्याची बचत करावी तसेच नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये. शहराचा आगामी पाणीप्रश्न केवळ प्रशासनाचा नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच तो प्रभावीपणे हाताळता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीला प्राधान्य देऊन नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment