ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामात अडथळा; आरोपीला ५ महिने साधा कारावास व ८०० रुपयांचा दंड

On: October 19, 2026 12:40 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना ग्रामसेवकास शिवीगाळ करून मारहाण करणे, कार्यालयातील कागदपत्रांची नासधूस तसेच टेबलची काच फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ५ महिने साधा कारावास आणि ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एम. ए. कोठारी यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला.

या प्रकरणातील आरोपी रमेश मारोती उर्फ तुळशिराम येंबडवार (वय ४२, रा. गोपालपूर, ता. केळापूर, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आधारे फौजदारी प्रकरण क्र. २५/२०२२ पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट होते.

🎯 ग्रामपंचायत कार्यालयात घडली होती घटना

या प्रकरणाची घटना २३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी सुमारे १० वाजता आकोली बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली. त्यावेळी ग्रामसेवक प्रभाकर बापुराव फुलभोगे व इतर कर्मचारी शासकीय कामकाज करीत होते.

दरम्यान, आरोपी रमेश येंबडवार हा ग्रामपंचायत कार्यालयात आला. ‘ग्रामसभा का घेतली नाही?’ असा सवाल करीत त्याने ग्रामसेवकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांचा गळा धरून मारहाण केली. एवढेच नव्हे तर कार्यालयातील टेबलवरील महत्त्वाची कागदपत्रे फेकून देत टेबलची काच फोडली आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

🎯 विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

या घटनेनंतर ग्रामसेवक प्रभाकर फुलभोगे यांनी पांढरकवडा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, २९४, १८६, ५०६ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पूर्ण केल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चपाईतकर यांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.

🎯 चार साक्षीदारांची साक्ष; Plea Bargaining द्वारे गुन्ह्याची कबुली

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान फिर्यादीसह एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर आरोपीने Plea Bargaining (दोषारोप तडजोड) प्रक्रियेचा अवलंब करून गुन्ह्याची कबुली दिली. दीर्घकाळ चालणारी न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी तसेच शिक्षेत सवलत मिळण्यासाठी आरोपीने तडजोडीचा अर्ज केला.

न्यायालयाने फिर्यादी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २६५-बीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एम. ए. कोठारी यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

🎯 पाच महिन्यांच्या कारावासाचा ‘सेट ऑफ’

न्यायालयाने भादंवि कलम ३५३ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत प्रत्येकी ५ महिने साधा कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची तरतूद करण्यात आली.

तर अन्य संबंधित कलमांखाली आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

दरम्यान, आरोपी यापूर्वीच ५ महिने कारागृहात राहिलेला असल्याने, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४२८ अन्वये त्या कालावधीचा ‘सेट ऑफ’ देण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने सुनावलेल्या कारावासाच्या शिक्षेच्या संदर्भात त्याला पूर्वी भोगलेल्या कारावासाचा लाभ मिळाला.

या प्रकरणात पांढरकवडा ठाणेदार लहुजी तावरे, सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. आर. डी. मोरे, फिर्यादी प्रभाकर फुलभोगे तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी मनोहर कुमरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment