⛔ जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील गटात मिळविले यश
✍️वणी : प्रतिनीधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, नांदपेरा रोड येथील इयत्ता नववीतील विद्यार्थी संकल्प श्लोक रूधे याने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षांखालील गटात यश संपादन केले आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो आता विद्यालयासह यवतमाळ जिल्ह्याचे विभागस्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत संकल्पने आत्मविश्वास, अचूक तंत्र आणि उत्कृष्ट खेळकौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर देत आपले कौशल्य सिद्ध केले. कराटेसारख्या शिस्त, एकाग्रता, संयम आणि सातत्याची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात त्याने दाखविलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.

संकल्पच्या या यशामुळे लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या विभागस्तरीय निवडीबद्दल विद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे अध्यक्ष श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष श्री. बलदेव खुंगर, अकॅडेमिक डायरेक्टर श्री. प्रशांत गोडे तसेच प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी संकल्पचे कौतुक करत त्याला विभागस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिक्षकवृंदानेही त्याच्या यशाचे अभिनंदन केले.
संकल्पला विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री. रुपेश पिंपळकर आणि सौ. नेहा शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच संकल्पच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यामुळे त्याने हे यश मिळविल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
आता विभागस्तरीय स्पर्धेतही संकल्प उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे आणि यवतमाळ जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास विद्यालय परिवाराने व्यक्त केला आहे.










