⛔एपीआय गंभीर जखमी, पोलिसांकडून बंदुकीतून दोन राऊंड फायर,पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे कडून घटनास्थळाची पाहणी
✍️यवतमाळ: अशफाक खान
महागाव तालुक्यातील पुस नदीपात्रात अहोरात्र सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाईस गेलेल्या पोलिस पथकावरच रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दि.18 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास वाकोडी (वाडी) येथे घडली. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सुनील अंबुरे गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे आरोपी फरार आहेत.
🎯 कारवाईदरम्यान अचानक हल्ला
पोलीस एपीआय सुनील अंबुरे हे सहकाऱ्यांसह पुस नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर कारवाईसाठी गेले होते. यावेळी ट्रॅक्टरद्वारे रेती उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. एपीआय अंबुरे यांनी ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता, रेती तस्करीत सहभागी असलेल्या पाच जणांनी अचानक पोलिस पथकावर हल्ला चढवला.

🎯 स्वसंरक्षणासाठी दोन राऊंड फायर
हल्ल्यादरम्यान परिस्थिती गंभीर बनताच एपीआय अंबुरे यांनी स्वतःच्या बचावासाठी शासकीय बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. यामध्ये आरोपी गुलाब शेख यांच्या हाताला गोळी चाटून गेली असून तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरून फरार झाला. इतर आरोपींनीही अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
🎯 एपीआय जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
या झटापटीत एपीआय सुनील अंबुरे यांच्या तळहाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सवना येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
🎯 प्रशासन व पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक कुमार चिंता,तहसीलदार अभय मस्के, ठाणेदार धनराज निळे, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकासह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात शांतता असून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

🎯 जनतेत संताप; तस्करांच्या मुजोरीवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रेती तस्कर अधिक शिरजोर झाल्याचे चित्र आहे. थेट प्रशासन व पोलिसांवर हल्ले होत असल्याने “ही मुजोरी कुणाच्या आशिर्वादाने?” असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात असून, तस्करीच्या मुळावरच घाव घालण्याची मागणी जोर धरत आहे.
🎯 रेती तस्करी विरोधात कडक भूमिका – तहसीलदार अभय मस्के
महागाव तालुक्यातील अवैध रेती व माती तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. महसूलच्या तिजोरीत वाढ व्हावी यासाठी आतापर्यंत अनेक तस्करांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला असल्याचे तहसीलदार अभय मस्के यांनी स्पष्ट केले.
🎯 रेती तस्करांना सोडणार नाही – एसडीओ सखाराम मुळे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय महसूल अधिकारी (एसडीओ) सखाराम मुळे यांनी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता महागाव तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व तलाठ्यांची तातडीची बैठक घेतली. “तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत रेती तस्करी होऊ देणार नाही. तात्काळ आणि कठोर कारवाई करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
🎯अपडेट
🔺दोन आरोपी अटकेत
🔺तिघे आरोपी फरार, शोधमोहीम सुरू
🔺एपीआय सुनील अंबुरे यांच्यावर उपचार सुरू
🔺परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, स्थिती नियंत्रणात
ही घटना अवैध रेती तस्करीच्या गंभीर स्वरूपावर प्रकाश टाकणारी असून, प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.











