✍️पांढरकवडा : अशफाक खान
राजश्री शाहू विद्यालयातून सेवा निवृत्त झालेले ज्येष्ठ शिक्षक, तिरळे कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच सल्लागार समितीचे सदस्य श्री. त्रिंबकराव भोयर (वय ६३) यांचे आज रविवार , दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:४५ वाजता उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पांढरकवडा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
🎯अपघाताची सविस्तर माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान पांढरकवडा–केळापूर महामार्गावर गुरुकुल इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर त्यांचे दुचाकीचा अपघात घडला होता. श्री भोयर हे पांढरकवडा येथून दुचाकीने बोथ येथील आपल्या शेताकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही अखेर रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
🎯 शिक्षण व समाजकार्यातील मोलाचे योगदान
आखाडा परिसरातील लोकमान्य टिळक वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या श्री. भोयर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिस्तप्रिय, अभ्यासू आणि मार्गदर्शक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
तसेच तिरळे कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष या नात्याने समाजहितासाठी विविध उपक्रम राबवित त्यांनी संघटनात्मक बांधणी, मार्गदर्शन व नेतृत्व दिले. सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शक भूमिका बजावली.
🎯 कुटुंबीय व अंत्यसंस्कार
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शोकसंदेश व श्रद्धांजली
श्री. त्रिंबकराव भोयर यांच्या निधनाने तिरळे कुणबी समाजाने एक अनुभवी, निष्ठावान आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची, दिलेल्या मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची आठवण समाजात कायम राहील, अशा शब्दांत विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
— शिक्षण, समाजसेवा आणि मूल्यनिष्ठेचा आदर्श ठेवणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांचे कार्य आणि स्मृती सदैव प्रेरणादायी ठरणार आहेत.











