✍️झरी-जामणी तालुका | प्रतिनिधी
झरी-जामणी तालुक्यातील कारेगाव पारंबा गावालगत चारही बाजूंनी घनदाट वनपरिसर पसरलेला आहे. या वनपरिसरात विविध प्रकारचे वन्य प्राणी वास्तव्यास असून, रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात ते शेतकऱ्यांच्या शेतात येतात. यामुळे कधी कधी पिकांचे नुकसान होत असले, तरी ग्रामस्थ वन्य प्राण्यांबाबत सहानुभूतीची भूमिका घेत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
नेहमीप्रमाणे एका रात्री एक माकड अन्नाच्या शोधात गावालगत असलेल्या श्री. संजयजी मोहुर्ले यांच्या शेतात आले. मात्र, रात्र उलटून गेल्यानंतरही ते माकड जंगलात परत गेले नाही. दुसऱ्या दिवशी अंदाजे दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावात येणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने माकडाला जोरदार विद्युत शॉक बसला आणि ते खाली कोसळले. वेदनेने माकड ओरडू लागल्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून पोहोचले.
घटनास्थळी पाहणी करता विद्युत प्रवाहामुळे माकड गंभीररीत्या जखमी झाल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी एकत्र येत माकडाला सावधपणे उचलले आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील हनुमान मंदिरात ठेवले. त्या वेळी सायंकाळचे सात वाजले होते. गाव ग्रामीण भागात असल्याने रात्रीच्या वेळी पशुवैद्य उपलब्ध होऊ शकले नाहीत.
मात्र ग्रामस्थांनी हार न मानता दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजताच पशुवैद्यांना बोलावून माकडावर तातडीने उपचार सुरू केले. उपचारानंतर माकडाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. प्रकृती स्थिर झाल्याची खात्री होताच ग्रामस्थांनी वन विभागाच्या पथकाला पाचारण केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन माकडाला आपल्या ताब्यात घेतले व पुढील उपचार व पुनर्वसनासाठी नेले.
या घटनेमुळे कारेगाव पारंबा येथील ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेचे आणि वन्यजीव संरक्षणाबाबतच्या सामाजिक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये माणुसकी जपण्याचा हा आदर्श प्रसंग ठरला आहे.










