✍️झरी : अशफाक खान
पाटण पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत यशस्वी उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी पाटण पोलीस स्टेशन येथे दाखल अप. क्र. 70/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फिर्यादीने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने फिर्यादीच्या शेतातून MH 29 BX 3191 क्रमांकाची होंडा शाईन मोटरसायकल, अंदाजे किंमत 50,000 रुपये, चोरून नेली होती.
तक्रार दाखल होताच पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. मिलिंद सरकटे यांनी तात्काळ तपास सुरू करून विशेष पथकाची नियुक्ती केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिकारी श्री. अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपीचा माग काढला. यामध्ये गोविंद लालु आत्राम (वय 40 वर्ष, रा. कमळवेल्ली, ता. झरी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल चोरीची कबुली दिली.
यानंतर आरोपीकडून चोरी गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली. पुढील तपासात आरोपीकडून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने पाटण पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या अप. क्र. 55/2026, कलम 331(4) व 305 (घरफोडी) BNS अंतर्गत गुन्ह्याची देखील कबुली दिली.
या गुन्ह्यात आरोपीने चोरी केलेले सुमारे 4 तोळे चांदीचे दागिने व 5,000 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
या संपूर्ण कारवाईत PSI नागोराव जाधव, पोलीस हवालदार रतीश वानखेडे, पोलीस हवालदार अमित पोयाम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बोंडे, प्रशांत तलांडे आणि हेमंत कामटवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रतीश वानखेडे यांनी ठाणेदार श्री. मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पाडला.











