✍️यवतमाळ | अशफाक खान
दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या कथित लाचखोरीच्या प्रकाराचा अँटी करप्शन ब्युरो (ACB), यवतमाळ यांनी पर्दाफाश केला असून मालमत्तेच्या फेरफार प्रकरणात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन शासकीय अधिकाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आल्याने दिग्रस शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालय, दिग्रस येथील उपअधिक्षक सखाराम नरसिंग पवार (वय ४९) आणि नझूल परिरक्षण भूमापक आशिष काशिनाथ शेलोकर (वय ४७) या दोघांना एसीबी पथकाने अटक केली आहे.
🎯 प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदार महिला यांच्या सासऱ्यांनी त्यांची मालकीची मालमत्ता तक्रारदार व त्यांच्या पतीस बक्षीसपत्राद्वारे (Gift Deed) दिली होती. या बक्षीसपत्राच्या आधारे संबंधित मालमत्तेचा अधिकृत फेरफार (Mutation Entry) करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय, दिग्रस येथे सादर केली होती. सदर कागदपत्रे स्वीकारल्यानंतर भूमापक आशिष शेलोकर यांनी तक्रारदार महिलेला उपअधिक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले.
🎯 लाचेची मागणी व पडताळणी
फेरफार करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिलेकडे स्वतःसाठी व उपअधिक्षकासाठी एकूण ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदार महिलेनं अँटी करप्शन ब्युरो, यवतमाळ येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पडताळणी कारवाई केली.
या पडताळणीदरम्यान आरोपी भूमापक आशिष शेलोकर यांनी फेरफार करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास स्पष्ट मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले.
🎯 सापळा कारवाईत रंगेहात अटक
त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा कारवाई राबवली. सापळा कारवाईदरम्यान आरोपी आशिष शेलोकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार महिलेकडून ५ हजार रुपये स्वीकारले. यापैकी अडीच हजार रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित अडीच हजार रुपये उपअधिक्षक सखाराम पवार यांना देताना, दोन्ही आरोपींना उपअधिक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले.
🎯 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चालू आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र – बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक – सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधिक्षक – अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.
🎯 नागरिकांना एसीबीचे आवाहन
दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, शासकीय कार्यालयांतील लाचखोरीवर कठोर कारवाईचा इशारा देणारी ठरली आहे.










