✍️पांढरकवडा: अशफाक खान
बंजारा समाजाचे आराध्य दैवत व क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जाणारे संत सेवालाल महाराज यांची 287 वी जयंती येत्या 15 फेब्रुवारी रोजी साजरी होत असून कळंब तालुक्यातील ताड्या तांड्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पत्रकार संरक्षण समिती कळंब तालुका अध्यक्ष विरेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
संत सेवालाल महाराज यांनी आधुनिक काळाचा विचार करून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देत परिवर्तनाची वाट दाखविली. गो-धन पालन, मीठ, साखर व अन्नधान्याचा व्यापार यांसारख्या प्रामाणिक व्यवसायांद्वारे त्यांनी बंजारा समाजाला स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. “चोरी करू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका, स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या” असा स्वाभिमानी संदेश देत त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान यांचे महत्त्व पटवून दिले.
विरेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज जयंती हा बंजारा समाजासाठी दिवाळीप्रमाणे आनंदाचा आणि अभिमानाचा सण आहे. त्यामुळे प्रत्येक तांड्यात घरोघरी दिवे लावून, घरांवर पांढरे ध्वज फडकवून आणि सामाजिक एकात्मता जपत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. तसेच महाराजांच्या विचारांची पेरणी करून आदर्श तांडा निर्मिती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या जयंतीनिमित्त समाजातील युवकांनी व्यावसायिक शिक्षणावर भर देणे, कौशल्य विकसित करणे आणि रोजगाराभिमुख वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराजांनी मांडलेले विचार आजही तितकेच प्रेरणादायी असून आर्थिक स्वावलंबनाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या उत्सवाच्या माध्यमातून समाजबांधवांनी व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी, सामाजिक ऐक्य दृढ करावे आणि पुढील पिढीला संस्कार व शिक्षणाची दिशा द्यावी, असे आवाहन घुमंतू जनजाती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विरेंद्र चव्हाण यांनी केले.
संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त ताड्या तांड्यासह परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, समाजप्रबोधनपर उपक्रम तसेच सामूहिक स्नेहमेळावे आयोजित करण्याची तयारी सुरू असून संपूर्ण बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराजांच्या विचारांवर चालत स्वाभिमानी, सुशिक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.










