✍️पांढरकवडा– अशफाक खान
मध्य प्रदेशातील सहा वर्षीय हरवलेल्या चिमुरड्याचा शोध घेऊन त्याला सुखरूपपणे वडिलांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी पांढरकवडा पोलिसांनी केली आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली.
पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० जानेवारी २०२६ पासून जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश हरवलेल्या महिला, पुरुष, घरून निघून गेलेले व्यक्ती तसेच लहान मुलं-मुली यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणे हा आहे.
दरम्यान, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पांढरकवडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आखाडा वार्ड परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना शासकीय मैदानाजवळ एक सहा वर्षीय मुलगा घाबरलेल्या अवस्थेत एकटाच उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्या बालकाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.
चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव आयुष युवराज बाहे (वय ६ वर्षे) असे सांगितले. तो हिंदी भाषिक असून त्याला आपल्या आई-वडिलांचा पत्ता किंवा राहण्याचे ठिकाण स्पष्टपणे सांगता येत नव्हते. परिस्थितीची गंभीरता ओळखून पोलिसांनी त्याला सुरक्षितरित्या पोलिस ठाण्यात आणले आणि त्याचे छायाचित्र पांढरकवडा शहर व परिसरातील विविध व्हॉट्सअॅप गटांवर प्रसारित केले. तसेच शहरात प्रत्यक्ष शोधमोहीम राबविण्यात आली.
तपासादरम्यान आयुषचे वडील युवराज राम बाहे (वय ३५ वर्षे, रा. शेवटी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) हे कामाच्या निमित्ताने पांढरकवडा येथील श्यामनगरी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधून खात्री केली. आवश्यक पडताळणीनंतर आयुषला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलाला सुरक्षित परत मिळाल्याने वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस हवालदार प्रमोद जुनूनकर, विलास जाधव आणि होमगार्ड रोशन सोमशेट्टीवार यांनी ही कार्यवाही पार पाडली.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत पांढरकवडा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका निष्पाप बालकाचे कुटुंबाशी पुनर्मिलन शक्य झाले असून, पोलिसांच्या सजगतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.










