✍️पांढरकवडा : अशफाक खान
ग्रामीण भागातील बालक, किशोरी व मातांच्या आरोग्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शिवरामजी मोघे महाविद्यालय, केळापूर (पांढरकवडा) येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पहापळ गावातील चार अंगणवाडी केंद्रांचा सर्वेक्षित अभ्यास नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या सर्वेक्षणात गावातील किशोरी मुली, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांचा सखोल आरोग्य आढावा घेण्यात आला. बालकांचे वजन व उंची मोजून त्यांच्या वाढीचा अंदाज घेण्यात आला आणि त्यानुसार पोषणस्थितीचे विश्लेषण करण्यात आले. बालकांमध्ये कुपोषण, कमी वजन किंवा वाढीतील विलंब यांसारख्या बाबींची नोंद घेऊन पालकांना संतुलित आहार, पूरक पोषण आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरी मुलींसाठीही स्वतंत्र सत्र घेऊन पौगंडावस्थेतील आरोग्य, रक्ताल्पता (ॲनिमिया ), वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना गर्भावस्थेतील काळजी, लसीकरणाचे महत्त्व, आयर्न-कॅल्शियमयुक्त आहार, तसेच बाळाच्या योग्य संगोपनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय, एक ते सहा वयोगटातील बालकांच्या संगोपनात पालकांना भेडसावणारी विविध आव्हाने—जसे की योग्य आहार नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, स्वच्छता, लसीकरणाबाबत जागरूकता आणि शिक्षणाची प्राथमिक तयारी—यावरही सर्वेक्षण करण्यात आले. या माहितीच्या आधारे भविष्यात अधिक परिणामकारक जनजागृती उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांतील २ ते ६ वर्ष वयोगटातील एकूण २० मुलींना गृह अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींकडून शिवून घेतलेले फ्रॉकचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वतः डिझाइन व शिवणकाम करून तयार केलेले हे वस्त्रवाटप उपक्रम उपस्थित पालकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी शिक्षिका सौ. मंदाबाई काळे, सौ. कांचन खांडरे, श्रीमती अरुणा पाटील व श्रीमती चंदा शुक्ला यांनी सक्रिय सहकार्य केले. तसेच गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उषा राखुंडे यांच्या नेतृत्वाखाली बी.ए. तृतीय वर्षातील एकूण वीस विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष गावभेट, मोजमाप, नोंदवही लेखन व मार्गदर्शन सत्रे यामध्ये मनापासून परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील आरोग्य व पोषणविषयक जाणीव वाढविण्यासाठी अशा प्रकारचे सर्वेक्षणात्मक उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण झाला असून भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.










