✍️मारेगाव: अशफाक खान
मारेगाव शहरातील विश्रामगृह परिसरात वास्तव्यास असलेल्या एका २२ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. संकेत शशिकांत कोरले असे मृत तरुणाचे नाव असून, पितृविरहाच्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
🎯 घरात एकटाच असताना घटना
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी संकेतने राहत्या घरी गळफास घेतला. त्या वेळी घरात कोणीही नसल्याने ही घटना लक्षात आली नाही. कुटुंबीय घरी दुपारी 3 वाजता दरम्यान परतल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
🎯 शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा
संकेत हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. आई शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, तर धाकटी बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.
शिक्षण सुरू, पण मानसिक तणाव वाढत होता?

संकेत यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मात्र गेल्या काही दीवसापासून तो मारेगाव येथेच वास्तव्यास होता. वडिलांच्या निधनानंतर तो मानसिकदृष्ट्या खचलेला असल्याचे काही परिचितांचे म्हणणे आहे. त्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🎯 पोलिसांची कारवाई व तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
🎯 परिसरात हळहळ, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
संकेतच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई व बहिणीवर या घटनेचा मोठा आघात झाला असून परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेची गरज तरुणांमध्ये वाढता तणाव, शैक्षणिक दडपण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक दुःख या गोष्टींमुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा प्रसंगी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाने संवाद वाढवणे, समुपदेशनाचा आधार घेणे आणि भावनिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.








