✍️पांढरकवडा: अशफाक खान
यवतमाळ–घाटंजी मार्गावरील सावरगड पांढरी परिसरात मंगळवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत युवकाचे नाव अमोल राजू चव्हाण (वय २५, रा. वासरी तांडा, ता. घाटंजी) असे आहे. तो वन विभागात कंत्राटी पद्धतीवर ‘डेली वेजेस’ कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा शासकीय कामानिमित्त यवतमाळ येथे गेला होता. काम आटोपून तो सायंकाळी आपल्या गावी परतत असताना सावरगड पांढरी जवळ त्याच्या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, अंधार असल्यामुळे रस्त्यावर असलेल्या बैलगाडीचा अंदाज न आल्याने अमोलच्या मोटारसायकलने (क्र. MH 29 BT 4536) बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी होऊन डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की त्याला वाचवण्याची संधीच मिळाली नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास सुरू असून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

🎯 कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अमोल चव्हाण हा घरातील एकमेव कमावता आणि कर्ता पुरुष होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि त्याला केवळ ६ महिन्यांचे चिमुकले बाळ आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या अपघाताने संपूर्ण वासरी तांडा आणि घाटंजी परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.








