✍️पांढरकवडा: अशफाक खान
शहरातील वाढते अतिक्रमण आणि बिघडलेली वाहतूक व्यवस्था आता नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. विशेषतः शिबला रोडवर दररोज तासन्तास वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्णवाहिकांपर्यंत सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्त्यावरही हीच परिस्थिती असताना संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पांढरकवडा शहराची रचना मूळतः सुटसुटीत आणि नियोजनबद्ध आहे. रुंद रस्ते आणि मोठ्या गल्ल्या ही या शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या अतिक्रमणामुळे या रस्त्यांचा श्वास गुदमरू लागला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर हातगाडीधारक, फळ-भाजी विक्रेते तसेच लहान-मोठे व्यवसायिक यांनी रस्त्यावरच आपले व्यवसाय थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

हे व्यवसायिक उपजीविकेसाठी रस्त्यावर उतरले असले तरी त्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अनेक महिन्यांपासून या विक्रेत्यांना हक्काची जागा देण्याची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, हे विक्रेते मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय करत असून, त्याचा फटका थेट वाहतूक व्यवस्थेला बसत आहे.
यासोबतच, काही मोठ्या व्यापाऱ्यांकडून मालवाहतूक करणारे ट्रक आणि इतर जड वाहने भर रस्त्यावर उभी करून माल उतरविण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे रस्ते अडवले जात असून इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे. अशा वाहनांना ठराविक वेळेतच माल उतरविण्याची परवानगी देण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा शिबला मार्ग हा सध्या वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरला आहे. या मार्गावर विविध शाळा, महाविद्यालये, उपजिल्हा रुग्णालय, बाजार समिती आदी महत्वाची ठिकाणे असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करत असतात. मात्र रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण, आणि अनियमित पार्किंग यामुळे वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

परिस्थिती इतकी गंभीर आहे की, शाळेच्या बसेस, रुग्णवाहिका आणि एसटी बसेसही या कोंडीत अडकून पडत आहेत. आपत्कालीन सेवांनाही विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, नगर परिषद आणि वाहतूक विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही. अतिक्रमण हटविणे, विक्रेत्यांचे पुनर्वसन, वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक नेमणे, तसेच रस्त्यांची दुरुस्ती करणे या बाबींवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.
🎯 नागरिकांची प्रमुख मागणी:
🔺रस्त्यांवरील अतिक्रमणावर तात्काळ कारवाई
🔺हातगाडी व फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे
🔺जड वाहनांसाठी वेळ निश्चित करणे
🔺शिबला रोडसह मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
🔺वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय करणे
जर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष दिले नाही, तर येणाऱ्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.








