✍️यवतमाळ : अशफाक खान
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रावेर येथे २०२० मध्ये घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड व अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील उत्कृष्ट तपासामुळे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा सध्याचे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या कार्याची राज्य पोलीस दलात विशेष दखल घेण्यात आली आहे.
सदर प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय, भुसावळ यांनी आरोपी महेंद्र सीताराम बरेला याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा सुनावत हा गुन्हा “दुर्मीळातील दुर्मीळ (Rarest of Rare Case)” स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. याशिवाय पोक्सो आणि बलात्कारासंदर्भातील कलमांखाली आरोपीला आमरण जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
🎯 नेमके काय घडले होते?
दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी रावेर पोलीस ठाण्यात शेख मुस्तफा शेख यासीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतात मजुरी करणारे दाम्पत्य नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यांची दोन मुले व दोन मुली अशी चार अल्पवयीन मुले शेतातील घरात एकटीच होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यानंतर घराचे दार बंद आढळल्याने शेख मुस्तफा यांनी दरवाजा उघडून पाहिले असता चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली दिसली. मृतांमध्ये १३ वर्षीय मुलगी, ११ वर्षीय मुलगा, ८ वर्षीय मुलगा आणि ६ वर्षीय मुलगी यांचा समावेश होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
🎯 बलात्कारानंतर हत्या
प्राथमिक तपासात मृत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३७६(ए), ४५२, २०१ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ ची भर घालण्यात आली.
🎯 तपासासमोर मोठे आव्हान
घटनास्थळ हे एकांतातील शेतात असल्याने आरोपीचा थेट सुगावा लावणारा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. अशा परिस्थितीत या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे सोपविण्यात आला.
🎯 ‘लास्ट सीन थिअरी’ आणि वैज्ञानिक पुराव्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
कुमार चिंता यांनी पारंपरिक तपास पद्धती, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसी कौशल्य यांचा प्रभावी वापर करून तपासाची दिशा निश्चित केली. त्यांनी ‘लास्ट सीन थिअरी’च्या आधारे महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपी महेंद्र बरेला हा हत्येच्या काही तासांपूर्वी मृत बालकांपैकी एका मुलासोबत दिसल्याचे सिद्ध केले.
याशिवाय गुन्ह्यानंतर आरोपीने शेतातील पाण्याच्या नळावर जाऊन रक्ताने माखलेले हात-पाय धुतल्याची बाबही तपासातून समोर आली. आरोपीचे हे संशयास्पद आणि अपराधी वर्तन न्यायालयात प्रभावीपणे सिद्ध करण्यात आले.
तपासादरम्यान घटनास्थळावरील जैविक नमुने व अन्य महत्त्वाचे पुरावे वेळेत न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवून त्यांची कायदेशीर साखळी अबाधित ठेवण्यात आली. वैज्ञानिक तपासातून आरोपीचा गुन्ह्यातील थेट सहभाग निष्पन्न झाला. तसेच चारही बालकांचा मृत्यू कुऱ्हाडीच्या वारामुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांद्वारे सिद्ध करण्यात आले.
🎯 सहा वर्षांच्या सुनावणीनंतर ऐतिहासिक निकाल
तपास पूर्ण करून मुदतीत आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विशेष खटला क्रमांक १४२/२०२० अंतर्गत सुनावणी सुरू झाली. जवळपास सहा वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर दिनांक ४ जून २०२६ रोजी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला.
न्यायालयाने आपल्या निकालात तपास अधिकारी कुमार चिंता यांनी केलेल्या सखोल, काटेकोर आणि वैज्ञानिक तपासाची विशेष दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच हा गुन्हा मानवतेला काळिमा फासणारा आणि समाजाला हादरवून सोडणारा असल्याचे नमूद केले.
🎯 पोलीस महासंचालकांकडून अभिनंदन
या यशस्वी तपासाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळाल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या निकालामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गुन्हेगारीविरोधातील प्रभावी तपासाचे हे एक आदर्श उदाहरण मानले जात आहे.









