✍️यवतमाळ : अशफाक खान
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यावर हल्ला करून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ₹3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता अकोला बाजार येथील व्यापारी सैय्यद एजाज मुसा (रा. रुई) हे त्यांचे के.जी.एन. कन्फेक्शनरी व किराणा दुकान बंद करून दिवसाची ₹55 हजारांची रोकड घेऊन दोन कामगारांसह दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, ग्राम बोरीसिंह शिवारात अंधाराचा फायदा घेत दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉडने हल्ला केला. व्यापाऱ्याला जखमी करून दुचाकीच्या डिकीत ठेवलेली रोकड जबरदस्तीने हिसकावून आरोपी फरार झाले.
या घटनेप्रकरणी जखमी व्यापाऱ्याचे कामगार सोहेल युसुफ कुरेशी (रा. रुई वाई) यांच्या फिर्यादीवरून वडगाव जंगल पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 186/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) व 61(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव जंगल पोलीस ठाण्याची मिळून पाच विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम शेख हुसेन शेख मेहबूब (वय 28, रा. रुई) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पैशांच्या लोभातून इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे दारव्हा परिसरातून उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले.
🎯 अटक आरोपी
1. शेख हुसेन शेख मेहबूब (28, रा. रुई)
2. राहुल गौतम कवळे (29, रा. रुई)
3. शुभम ज्ञानेश्वर तुरे (22, रा. तरनोळी, ता. दारव्हा)
4. आकाश अरुण चव्हाण (22, रा. तरनोळी, ता. दारव्हा)
5. रोहन राजू राठोड (19, रा. तरनोळी, ता. दारव्हा)
6. सैय्यद साजेब सैय्यद मेहफूज (19, रा. रुई)
7. विशाल देवराव मेश्राम (25, रा. मांगुळ)
आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹3.10 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैसाने, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, वडगाव जंगलचे ठाणेदार विकास दांडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस ठाणे करीत आहे.








