✍️यवतमाळ : अशफाक खान
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यवतमाळने बुधवारी (२२ जुलै) भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक मोठी कारवाई करत महागाव तालुका येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका तथा अतिरिक्त कार्यभार बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शकुंतला जयवंत इंगोले (वय ५७) यांना ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.
तक्रारदार असलेल्या २१ वर्षीय महिलेने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. या पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी १०,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची दखल घेत २२ जुलै २०२६ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपी अधिकाऱ्यांनी तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून ५,००० रुपये आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५,००० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिलेला पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या महागाव येथील राहत्या घरी पाठविण्यात आले. तेथे आरोपीने आपल्या घरातील स्वयंपाकघरात ५,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला. लगेचच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. व्हिडिओग्राफीच्या उपस्थितीत स्वयंपाकघरातील गॅस ओट्याखालील पहिल्या कप्प्यात ठेवलेली ५,००० रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात येत आहे.
🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही सापळा कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक सचिंन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पर्यवेक्षणात पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके यांच्यासह एसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
🎯 नागरिकांना एसीबीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल. सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम नियमानुसार एका महिन्याच्या आत परत केली जाईल, तसेच तक्रारदाराचे वैध शासकीय कामही पूर्ण करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
संपर्क
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ – दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ
टोल फ्री क्रमांक : १०६४
दूरध्वनी : ०७२३२-२४४००२ / ८९७५७९१०६४
ई-मेल : dyspacbyavatmal@mahapolice.gov.in
ही कारवाई सार्वजनिक सेवेत पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.











