✍️यवतमाळ | अशफाक खान
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील दोन गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ₹60,10,802 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
🎯 ज्वेलर्स दुकान फोडून सुमारे ₹97.50 लाखांचा ऐवज लंपास
दिनांक 15 जुलै 2026 रोजी मध्यरात्री पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मोहदा येथे राजेंद्र श्रीमल वर्मा (वय 61) यांच्या राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप फोडून दुकानात प्रवेश केला. आरोपींनी सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹97,50,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी श्री. राजेंद्र वर्मा यांच्या फिर्यादीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 887/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305, 303(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
🎯 त्याच परिसरात दरोड्याचीही घटना
यापूर्वी 14 जुलै 2026 रोजी रात्री मोहदा–मेटीखेडा मार्गावरील विरेंद्र तोडकरी यांच्या शेताजवळ सात अज्ञात आरोपींनी रविंद्र मंगल कांबळे (वय 30) यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ₹44,300 किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला होता.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 915/2026 अंतर्गत BNS कलम 310(2) अन्वये दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
🎯 तांत्रिक तपासातून उलगडला गुन्हा
दोन्ही गंभीर घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने सात विशेष तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन पुणे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी प्रथम विशाल रघु कुंभार (वय 25, रा. चाकण, जि. पुणे) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आरोपींना अटक करण्यात आली—
– सौरुपशी उर्फ सौरसिंग राजकुमार राठोड (वय 34, रा. शिक्रापूर, जि. पुणे)
– अभिमन्यू अलसींग राठोड (वय 38, रा. डाळिंब, जि. पुणे)
चौकशीदरम्यान आरोपींनी ज्वेलर्स चोरी व दरोडा या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.
₹60.10 लाखांचा मुद्देमाल जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी—
– सोन्याचे दागिने,
– रोख रक्कम,
– मोबाईल फोन,
– गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन
असा एकूण ₹60,10,802 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.
🎯 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहु तावरे, सायबर पोलीस ठाणे, यवतमाळच्या प्रभारी अधिकारी यशोधरा मुनेश्वर, शिरपूर पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष मनवर, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ता पेंडकर, धीरज बांडे, तसेच पोउपनि धनराज हाके, सागर इंगळे, शिवशंकर कार्यदे, अमोल राठोड, नितीन सुशीर, शरद लोहकरे आणि स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस, पांढरकवडा, शिरपूर व उमरखेड येथील अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.








